विश्वचषक स्पर्धेतल रविवारी झालेल्या आपल्या पहिल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर सहा विकेट्स राखून मात केली. या सामन्यात विराट कोहली आणि लोकेश राहुल यांनी केलेली १६५ धावांची भागीदारी भारताच्या विजयात निर्णायक ठरली होती.
दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोस हेझलवूड याने भारताकडून झालेल्या पराभवानंतर मोठं विधान केलं आहे. आमच्या पराभवामध्ये मिचेल मार्शने विराट कोहलीच्या सोडलेल्या झेलाची कुठलाही भूमिका दिसत नाही. तर कुलदीप यादवसारखे गोलंदाज आमच्यासाठी त्रासदायक ठरले. भारताचा डाव अचडणीत असताना आठव्या षटकात हेझलवूडच्या गोलंदाजीवर विराट कोहलीला जीवदान मिळाले होते. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर मिचेल मार्शने त्याचा झेल सोडला होता. विराटच्या बॅटवर आदळून चेंडू ऊंच उडाल्यानंतर झेल टिपण्यासाठी मिचेल मार्श आणि अॅलेक्स कॅरी धावले. मात्र चेंडूच्या टप्प्यात पोहोचलेल्या मिचेल मार्शने सोपा झेल सोडला. विराट कोहली तेव्हा १२ धावांवर खेळत होता. जीवदान मिळाल्यानंतर त्याने ८५ धावांची खेळी करत भारताचा विजय निश्चित केला.
जोस हेझलवूड म्हणाला की, ऑस्ट्रेलियाच्या पराभवामध्ये मिचेल मार्शची कुठलीही भूमिका नाही आहे. मला वाटत नाही की, अॅलेक्स कॅरी तिथपर्यंत पोहोचू शकले असते. हा मिचेल मार्शचाच झेल होता. त्याने तो सोडला. मात्र क्रिकेटमध्ये असं होत राहतं. प्रत्येकजण मेहनत करत आहे. यापुढेही करत राहू. दरम्यान, ऑस्ट्रेलियाला १९९ धावांत गुंडाळल्यानंतर भारताने पहिल्या दोन षटकांमध्येच ३ विकेट्स गमावले होते. त्यावेळी जर कोहली बाद झाला असता तर भारताची अवस्था ४ बाद २० अशी बिकट झाली असती.
जोस हेझलवूडने पुढे सांगितले की, आम्ही नव्या चेंडूने अचूक काम केले होते. फिरकीपटूंना खेळणं कठीण होईल, हे आम्हाला माहिती होते. मात्र त्यांनी चांगली भागीदारी केली. मात्र आम्हीही चांगली सुरुवात केली होती. यावेळी हेझलवूडने भारतीय गोलंदाजांचं विशेषकरून कुलदीप यादवचं कौतुक केलं. त्याने वॉर्नरसह दोन फलंदाजांना माघारी धाडले होते. कुलदीप यादव गेल्या दीड वर्षांपासून चांगली गोलंदाजी करत आहे. त्याची गोलंदाजी खेळणं कठीण होतं. त्याच्याजवळ चांगलं वैविध्य आहे. भारताचे तिन्ही फिरकीपटू एकमेकांपेक्षा वेगळे आहेत, त्यानुसार त्यांनी गोलंदाजी केली.