भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : आतापर्यंत भारतीय संघ पर्थच्या मैदानात चार कसोटी सामने खेळला आहे. पण अजूनही भारताचा कर्णधार कसोटी सामना खेळायला उतरलेला नाही. हे ऐकल्यावर तुम्हाला थोडंस अजब वाटेल. पण हे घडलेले आहे.
पर्थवर आतापर्यंत भारताने चार कसोटी सामने खेळले आहेत. चारपैकी तीन सामन्यांमध्ये भारताला मानहानीकारक पराभव पत्करावा लागला आहे.
भारताचा कर्णधार विराट कोहली 2013 साली पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला होता. कोहलीला पहिल्यांदा कर्णधारपद करण्याची संधी ऑस्ट्रेलियाच्याच दौऱ्यात मिळाली होती. या दौऱ्यात कोहलीने ६९२ धावांचा रतीब घातला होता. पण गेल्या दौऱ्यात एकही कसोटी सामना खेळवण्यात आला नव्हता. त्यामुळे आतापर्यंत एकदाही कोहली पर्थच्या खेळपट्टीवर कसोटी सामना खेळायला उतरलेला नाही.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पर्थ येथे पहिला सामना १९७७ साली झाला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दोन विकेट्स राखून विजय मिळवला होता. त्यानंतर भारतीय संघ या मैदानात थेट १९९२ साली उतरला होता. या सामन्यातली मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरची खेळी अविस्मरणीय अशीच होती. सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शंभर शतके जरी लगावली असली तरी सचिन हे शतक अजूनही विसरू शकलेला नाही. पण भारताला या सामन्यात तब्बल 3०० धावांनी पराभव पत्करावा लागला होता.
पर्थच्या खेळपट्टीवर त्यानंतर भारतीय संघ उतरला २००८ साली. हा सामना भारतीय संघ कधीच विसरु शकणार नाही. कारण या सामन्यात भारताने पर्थवर पहिल्यांदा विजय मिळवला होता. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियापुढे ४१३ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ ३४० धावांवर सर्व बाद झाला होता. २०१२ साली भारतीय संघ पर्थवर अखेरचा सामना खेळला होता. त्यावेळी भारताला एक डाव आणि ४१ धावांनी पराभव पत्करावा लागला होता.