मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका सध्याच्या घडीला 1-1 अशी बरोबरीत आहे. तिसरा कसोटी सामना मेलबर्न येथे 26 डिसेंबरपासून खेळवण्यात येणार आहे. पण हा सामना भारतीय संघ जिंकू शकत नाही, असे म्हटले जात आहे.
तिसरा कसोटी सामना 'बॉक्सिंग डे'च्या मुहुर्तावर खेळवला जाणार आहे. 'बॉक्सिंग डे' हा क्रिकेटसाठी शुभ मानला जातो. पण तो यजमान संघासाठी. त्यामुळे 'बॉक्सिंग डे'च्या दिवशी झालेला सामना यजमान संघ बहुतांशी वेळा हरत नाही, असे म्हटले जाते आणि ते खरेही आहे.
भारतीय संघ आतापर्यंत 'बॉक्सिंग डे'च्या दिवशी 14 कसोटी सामने खेळला आहे, पण भारताला या 14 पैकी 10 कसोटी सामने गमवावे लागले आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये 'बॉक्सिंग डे'च्या दिवशी भारतीय संघ आतापर्यंत सात सामने खेळला आहे. या सात सामन्यांपैकी भारताला पाच सामने गमवावे लागले आहेत, तर दोन सामन्यांचा निकाल लागू शकलेला नाही. त्याचबरोबर मेलबर्न हे मैदान ऑस्ट्रेलियासाठी लकी समजले जाते. कारण या मैदानात त्यांनी भारताविरुद्ध कधीही कसोटी सामन्यात पराभव पत्करलेला नाही. त्यामुळे आता तिसऱ्या सामन्यात भारताचा पराभव होणार आणि इतिहास कायम राहणार की भारतीय संघ विजयासह इतिहास रचणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
पर्थ कसोटीतील पराभवानंतर भारतीय खेळाडूंच्या कामगिरी बरोबरच कर्णधार विराट कोहलीचा आक्रमकपणा हा चर्चेचा विषय राहिला. कोहलीच्या या आक्रमकतेवर भारताचा माजी कसोटीपटू संजय मांजरेकरसह ऑस्ट्रेलियाचे दिग्गज अॅलन बॉर्डर, माईक हसी आणि मिचेल जॉन्सन यांनी टीका केली.