सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : कसोटी मालिकेतील ऐतिहासिक विजयानंतर मनोबल उंचावलेल्या भारतीय संघाने वन डे मालिकेतही दमदार सुरुवात केली. नाणेफेकीचा कौल यजमान ऑस्ट्रेलियाच्या बाजूने लागला असला तरी भारताने तिसऱ्याच षटकात कांगारूंना धक्का दिला. कसोटी मालिकेत खेळण्याची संधी न मिळालेल्या भुवनेश्वर कुमारने भारताला पहिले यश मिळवून दिले. त्याने तिसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर ऑसी कर्णधार अॅरोन फिंचचा त्रिफळा उडवला आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना एका विक्रमाच्या बाबतीत पिछाडीवर टाकले.
फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. फेब्रुवारी 2018 पासून झालेल्या 23 वन डे सामन्यांत ऑस्ट्रेलियाला केवळ 3 सामने जिंकता आले आहेत. त्यामुळे 2019 मध्ये चांगल्या कामगिरीचे त्यांचे लक्ष्य आहे. मे-जून मध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या दृष्टीनेही त्यांच्यासाठी ही मालिका महत्त्वाची आहे. पण, सामन्याच्या तिसऱ्याच षटकात फिंच माघारी परतला. भुवनेश्वरने त्याचा त्रिफळा उडवत कांगारूंना पहिला धक्का दिला.