मोहाली : ऑस्ट्रेलियाने दिलेल्या २७७ धावांच्या तगड्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय सलामीवीरांनी पाहुण्या संघाचा चांगलाच समाचार घेतला. मराठमोळा ऋतुराज गायकवाड आणि शुबमन गिल यांनी पहिल्या बळीसाठी तब्बल १४२ धावांची भागीदारी नोंदवली. चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या गिलने आजही कमाल करताना ट्वेंटी-२० चा खेळ दाखवला. सुरूवातीपासून रूद्रावतार दाखवून गिलने पाहुण्या गोलंदाजांवर दबाव कायम ठेवला. संधी मिळताच ऋतुराजने देखील चौकार ठोकून सहकारी फलंदाजाला साथ दिली.
भारतीय सलामीवीर चमकलेऋतुराज गायकवाड (७१) आणि शुबमन गिल (७४) धावा करून तंबूत परतले असले तरी भारतीय संघ विजयाच्या दिशेने कूच करत आहे. गिलने दोन षटकार आणि सहा चौकारांच्या मदतीने ७४ धावा कुटल्या. तर ऋतुराजने मिळालेल्या संधीचे सोने करताना १० चौकारांच्या मदतीने ७७ चेंडूत ७१ धावांची अप्रितम खेळी केली.
३० षटकांपर्यंत भारतीय संघ तीन बाद १७८ धावांवर खेळत आहे. पण, दुखापतीतून सावरत असलेल्या श्रेयस अय्यरला दणक्यात पुनरागमन करण्यात अपयश आले. अय्यर केवळ तीन धावांवर असताना कॅमेरून ग्रीनच्या हातून धावबाद झाला अन् भारताला तिसरा झटका बसला. सध्या कर्णधार लोकेश राहुल (१३) आणि इशान किशन (१५) धावा करून खेळपट्टीवर टिकून आहेत.
आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ - लोकेश राहुल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, इशान किशन, रवींद्र जडेजा, आर अश्विन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी.