हैदराबाद, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : महेंद्रसिंग धोनी हा एक निष्णात यष्टीरक्षक आहे. पण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात एक झेल सुटला आणि स्टेडियममध्ये धोनी, धोनी हा नाद घुमला.
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण त्यांचा हा निर्णय योग्य नसल्याचे मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमरा यांनी पहिल्याच स्पेलमध्येच दाखवून दिले. या दोघांच्या आठ षटकांच्या स्पेलमध्ये ऑस्ट्रेलियाला फक्त २३ धावाच करता आल्या होत्या. पण त्यानंतर मात्र ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी आक्रमक पवित्रा धारण केला. पण रवींद्र जडेजा आणि केदार जाधव या दोघांनी अचूक मारा करत ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येला लगाम लावला. केदारने पुन्हा एकदा भारताला मोठे यश मार्कस स्टॉइनिसच्या (३७) रुपात मिळवून दिले. कारण स्टॉइनिस आणि उस्मान ख्वाजा यांनी दुसऱ्या विकेटसाठी ८७ धावांची भागीदारी रचली होती. स्टॉइनिस बाद झाल्यावर 10 धावांमध्ये अर्धशतकवीर ख्वाजाही बाद झाला. कुलदीपने उस्मान ख्वाजाच्या रुपात भारताला घवघवीत यश मिळवून दिले. ख्वाजाने ५० धावा पूर्ण केल्या खऱ्या, पण त्यानंतर लगेचच कुलदीपने विजय शंकरकरवी झेलबाद केला आणि तंबूचा रस्ता दाखवला.
भारताला विजयासाठी २३७ धावा करायच्या होत्या. पण या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची ४ बाद ९९ अशी अवस्था झाली होती. त्यावेळी धोनीने संघाची जबाबादारी आपल्या खांद्यावर घेतली आणि केदार जाधवसह त्याने किल्ला लढवला.
ही गोष्ट आहे ३८व्या षटकातली. या षटकातील दुसऱ्या चेंडूवर धोनीने मिड ऑनला षटकार लगावला. त्यानंतरच्या चेंडूवर धोनीचा झेल उडाला होता. हा झेल टिपण्यासाठी मार्कस स्टॉइनिस झेपावला. हा चेंडू स्टॉइनिसने टिपला. त्यावेळी प्रेक्षकांना वाटले की धोनी बाद झाला. पण मैदानावरील पंच कुमार धर्मसेना यांनी यावेळी तिसऱ्या पंचांची मदत घेण्याचे ठरवले. तिसऱ्या पंचांनी अॅक्शन रिप्लेमध्ये पाहिले तेव्हा हा चेंडू प्रथम जमिनीला लागला होता आणि त्यानंतर तो स्टॉइनिसच्या हातामध्ये विसावला होता. हे पाहून तिसऱ्या पंचांनी धोनीला नाबद ठरवले. धर्मसेना यांनी जेव्हा धोनी नाबाद असल्याचे सांगितले तेव्हा मैदानात धोनी, धोनी हा नाद घुमायला सुरुवात झाली.