भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या पहिल्या वन डे सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या यजमानांना साजेशी सुरुवात करता आली नाही. नाणेफेकीचा कौल ऑस्ट्रेलियाच्या बाजूनं लागला आणि त्यांनी टीम इंडियाला प्रथम फलंदाजीला बोलावलं. पण, सामन्याच्या पाचव्या षटकात मिचेल स्टार्कनं टीम इंडियाला पहिला धक्का दिला. त्यानं रोहित शर्माला माघारी पाठवले. त्यानंतर शिखर धवननं सामन्याची सूत्र हाती घेताना, ऑस्ट्रेलियाविरुद्ध विक्रमाला गवसणी घातली.
मिचेल स्टार्कनं भारताला पहिला धक्का दिला. त्यानं रोहित शर्माला पाचव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर डेव्हिड वॉर्नरकरवी झेलबाद करून माघारी पाठवले. रोहित 15 चेंडूंत 2 चौकार लगावून 10 धावांवर बाद झाला. रोहित बाद झाल्यानंतर शिखर धवननं सामन्याची सूत्र हाती घेतली. त्यानं लोकेश राहुलसह सावध खेळ करताना संघाला 10 षटकांत 1 बाद 45 धावांपर्यंत मजल मारून दिली.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन डे क्रिकेटमध्ये 1000 धावा करण्याचा विक्रम आज धवननं केला. अशी कामगिरी करणारा तो पाचवा भारतीय फलंदाज ठरला आहे. या विक्रमात सचिन तेंडुलकर 3077 धावांसह ( 71 सामने) आघाडीवर आहे. त्यानंतर रोहित शर्मा ( 2047), विराट कोहली ( 1727), महेंद्रसिंग धोनी ( 1660) यांचा क्रमांक येतो.