ब्रिस्बेन, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने बाजी मारली. यजमानांनी भारतावर चार धावांनी विजय मिळवला. विजयासह ऑस्ट्रेलियाने तीन ट्वेन्टी-२० सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. या कामगिरीसाठी त्यांचे कौतुक होत आहे, परंतु यष्टिरक्षक अॅलेक्स करीच्या एका कृत्याने कांगारूंच्या मेहनतीवर पाणी फिरले आहे. ब्रिस्बेन येथे झालेल्या पहिल्या ट्वेंटी-20त त्याची रडीचा डाव कॅमेरात कैद झाला आणि नेटीझन्सना टीका करण्यासाठी आयतं कोलीत सापडलं.
भारताने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला फलंदाजीसाठी पाचारण केले होते. पावसाच्या व्यत्ययामुळे सामना प्रत्येकी १७ षटकांचा खेळवण्यात आला होता. ऑस्ट्रेलियाने ४ फलंदाजांच्या मोबदल्यात १५८ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने १५८ धावा केल्या असल्या तरी भारताने मात्र १७ षटकांत १६९ धावा केल्या, पण तरीही त्यांचा पराभव झाला. डकवर्थ लुईस प्रणालीनुसार भारतासमोर 174 धावांचे सुधारीत लक्ष्य ठेवण्यात आले होते.
भारतीय संघ फलंदाजी करत असताना 9व्या षटकात कांगारूंच्या अॅलेक्सचा रडीचा डाव पाहायला मिळाला. भारताचा लोकेश राहुल फलंदाजी करताना अॅडम झम्पाच्या गोलंदाजीवर अॅलेक्स स्मृतीभंश झाल्यासारखा वागला. त्याच्या ग्लोजला लागून बेल्स पडल्या आणि त्याने राहुल हिट विकेट असल्याची अपील केले. मैदानावरील पंचांनी तिसऱ्या पंचाकडे दाद मागितली. रिप्लेत राहुल स्पम्पपासून दूर असल्याचे दिसले आणि त्याच्या बॅचचा स्पम्पला स्पर्श न झाल्याचे स्पष्टपणे दिसत होते. त्या बेल्स अॅल्सच्या ग्लोजमुळे पडल्या होत्या. तरीही अॅलेक्सने अपील केल्याने नेटीझन्सने त्याच्यावर सडकून टीका केली.