India vs Australia Suryakumar Yadav : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेला सुरूवात झाली आहे. गुरूवारी झालेला पहिला सामना जिंकून यजमान भारतीय संघाने विजयी सलामी दिली. नवनिर्वाचित कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताची युवा ब्रिगेड बलाढ्य ऑस्ट्रेलियाला भिडत आहे. 'सूर्या'ने ८० धावांची अप्रतिम खेळी करून आपल्या संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. सामन्यानंतर बीसीसीआयने आपल्या कर्णधाराचा एक व्हिडीओ शेअर केला, ज्यामध्ये 'सूर्या' प्रश्नांची उत्तरे देताना दिसतो. भारतीय कर्णधाराने ४१ चेंडूत ८० धावांची स्फोटक खेळी करून सामना गाजवला. प्रथम फलंदाजी करताना कांगारूंनी २०९ धावांचे तगडे लक्ष्य ठेवले होते.
दरम्यान, सामन्यानंतर सूर्यकुमार यादवला त्याच्या खेळीबद्दल काही प्रश्न विचारण्यात आले. यातील एका प्रश्नाचे उत्तर त्याने चुकीचे दिले. खरं तर भारतीय कर्णधाराने सर्व प्रश्नांची योग्य उत्तरे दिली पण ज्या चेंडूवर तो बाद झाला त्याबद्दल उत्तर देताना मात्र 'सूर्या' फसला. त्याने मिश्किलपणे सांगितले की, ज्या चेंडूवर बाद होतो तो चेंडू कोण लक्षात ठेवेल.
- प्रश्न - तू किती चौकार मारले?
- उत्तर - ९ चौकार
- प्रश्न - तू किती षटकार मारले?
- उत्तर - ४ षटकार
- प्रश्न - तुझा स्ट्राईक रेट कितीचा होता?
- उत्तर - १९० (योग्य उत्तर - जवळपास १९१)
- प्रश्न - तुझ्या खेळीचे एका शब्दात वर्णन कर?
- उत्तर - निर्भय
अखेरच्या षटकात मोठा ट्विस्ट
भारताला विजयासाठी अखेरच्या षटकात सात धावांची आवश्यकता होती. रिंकू सिंगने पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकून विजयाकडे भारताची गाडी नेली. पण दुसऱ्या चेंडूवर एक धाव काढून त्याने अक्षर पटेलला फलंदाजीची संधी दिली. परंतु, मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात अक्षर बाद झाला. चौथ्या चेंडूवर रवी बिश्नोई बाद झाला तर त्याच्या पुढच्या चेंडूवर अर्शदीप सिंग धावबाद झाला. अखेरच्या चेंडूवर भारताला विजयासाठी एक धाव हवी होती. लक्षणीय बाब म्हणजे अखेरच्या चेंडूवर षटकार खेचून रिंकू सिंगने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. शेवटचा चेंडू नो बॉल असल्याने रिंकूला षटकार मारूनही सहा धावा मिळाल्या नाहीत.
Web Title: India vs Australia 1st t20 BCCI has shared a video of captain Suryakumar Yadav, in which he answers some questions
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.