विशाखापट्टणम, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात भारतीय संघाला पराभव पत्कराला लागला. भारतीय संघाने अखेरपर्यंत विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले. जस्प्रीत बुमराहने 19 व्या षटकात भेदक मारा करून सामना खेचून आणला, परंतु उमेश यादवला विजय मिळवून देता आला नाही. ऑस्ट्रेलियाने अखेरच्या चेंडूवर विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या सामन्यातील पराभवाला उमेशसह माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या संथ फलंदाजीलाही जबाबदार धरले जात आहे. नेटकऱ्यांनी उमेश आणि धोनी यांच्यावर टीकेचे बाणच सोडले. पण, ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज ग्लेन मॅक्सवेल धोनीच्या मदतीला धावून आला आहे.
भारतीय संघाने लोकेश राहुल ( 50), महेंद्रसिंग धोनी ( 29) व विराट कोहली ( 24 ) यांच्या खेळीच्या जोरावर 126 धावा उभ्या केल्या. भारताचे प्रमुख फलंदाज झटपट माघारी गेले असताना धोनीनं एक बाजू लावून धरताना 37 चेंडूंत 29 धावा केल्या. मात्र, धोनीला पूर्वीसारखी फटकेबाजी करण्यात अपयश आले आणि युजवेंद्र चहल नॉन स्ट्राईक एंडला असताना धोनीनं अनेकदा एकेरी धाव घेण्यास नकार दिला. त्याच्या या रणनीतीचा सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी चांगलाच समाचार घेतला. अनेकांनी तर धोनीला निवृत्तीचा सल्ला दिला.
मात्र, ग्लेन मॅक्सवेल धोनीच्या बाजूने उभा राहिला. तो म्हणाला,''ज्या प्रकारची खेळपट्टी होती, त्यावर असाच खेळ करणे अपेक्षित होते. येथे मोठे फटके मारणे जोखमीचं काम होतं आणि त्यात नॉन स्ट्राईलला असलेल्या चहलला असे फटके मारणे जमले नसते. त्यामुळे त्याने त्या परिस्थितीत चहलला स्ट्राईक न देणे योग्य होते. धोनी हा वर्ल्ड क्लास फिनिशर आहे आणि त्यामुळे त्याच्यावर टीका करणे अयोग्य आहे. त्याने अखेरच्या षटकात एक षटकार खेचला आणि भारताला त्या षटकात सात धावा करता आल्या. त्यावरून या खेळपट्टीवर फलंदाजी करणे किती आव्हानात्मक होते, याचा अंदाज येतो.''
127 धावांचे माफक लक्ष्य असूनही अखेरपर्यंत रोमहर्षक ठरलेल्या सामन्यात पाहुण्या ऑस्ट्रेलियाने बाजी मारली. ऑस्ट्रेलियाने पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात 3 विकेट राखून विजय मिळवताना मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. ग्लेन मॅक्सवेल ( 56) आणि डी अॅर्सी शॉर्ट ( 37) यांच्यामुळे ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला.