विशाखापट्टणम, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : न्यूझीलंड दौऱ्यात विश्रांतीवर गेलेल्या कर्णधार विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्याच ट्वेंटी-20 सामन्यात विक्रमाला गवसणी घातली. त्याने 12 वी धाव घेताच नावावर विक्रम नोंदवला. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. रोहित शर्माला माघारी पाठवून त्यांनी भारताला धक्का दिला, परंतु कोहली व लोकेश राहुल यांनी डाव सावरला. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली. मात्र, 24 धावांवर असताना अॅडम झम्पाने त्याला बाद केले.
विशाखापट्टणम येथेली डॉ. वाय. एस. राजसेखरा रेड्डी स्टेडियमवर कोहलीची बॅट चांलगीच तळपली आहे. त्याने येथे 118, 117, 99, 65, 167, 81 आणि नाबाद 158 धावांची खेळी साकारली आहे आणि त्याची सरासरी 134 हून अधिक राहिली आहे. त्यामुळे या सामन्यात त्याच्या फटकेबाजीसाठी सर्वच उत्सुक होते. कोहलीनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये 5 अर्धशतकं झळकावली आहेत. एकाच प्रतिस्पर्धीविरुद्ध सर्वाधिक अर्धशतक झळकावण्याच्या विक्रमात त्यानं श्रीलंकेच्या कुशल परेराशी बरोबरी केली आहे. ऑसीविरुद्धच्या दोन ट्वेंटी-20 सामन्यांच्या मालिकेत त्याने एक अर्धशतक झळकावल्यास या विक्रमात तो आघाडी घेऊ शकतो.
या सामन्याआधी कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 13 ट्वेंटी-20 सामन्यांत 61 च्या सरासरीनं पाच अर्धशतकांसह 488 धावा चोपल्या आहेत. एखाद्या संघाविरुद्ध कोणत्याही खेळाडूने केलेली ही सर्वोत्तम खेळी आहे. त्यात 12 धावांची भर घालताना कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 500 धावांचा पल्ला पार केला. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये एखाद्या संघाविरुद्ध 500 धावा करणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धही अशी कामगिरी करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला.