विशाखापट्टणम, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : ऑस्ट्रेलिया दौरा गाजवणाऱ्या भारतीय संघाला ट्वेंटी-20 मालिकेत 1-1 अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले होते. पावसामुळे मालिकेतील अंतिम सामना रद्द झाला होता. पण, ही कसर भरून काढण्याची संधी भारतीय संघाला मिळणार आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ दोन ट्वेंटी-20 आणि पाच वन डे सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारतात आला आहे. रविवारी विशाखापट्टणम येथे पहिला ट्वेंटी-20 सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्यातून लोकेश राहुल भारतीय संघात पुनरागमन करणार आहे, तर रिषभ पंतलाही आघाडीला खेळण्याची संधी मिळू शकते.
कर्णधार
विराट कोहलीही या मालिकेतून भारतीय संघात पुनरागमन करणार आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेत त्याला विश्रांती देण्यात आली होती. आगामी वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेवताना
लोकेश राहुल व
रिषभ पंत यांना छाप पाडण्याची अखेरची संधी आहे. त्यामुळे या मालिकेतील त्यांच्या कामगिरीकडे निवड समितीसह क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे. राहुलला सलामीला खेळता यावे यासाठी शिखर धवन किंवा रोहित शर्मा यांच्यापैकी एक माघार घेऊ शकतो. कारण, वर्ल्ड कप स्पर्धेत राहुलचा राखीव सलामीवीर म्हणून विचार केला जाऊ शकतो आणि त्यासाठी त्याला खेळण्याची पुरेशी संधी दिली जाऊ शकते.
भारताच्या ट्वेंटी-20 संघात महेंद्रसिंग धोनीसह रिषभ पंत व दिनेश कार्तिक या दोघांनाही संधी देण्यात आली आहे. मात्र, पहिल्या ट्वेंटी-20 साठी कार्तिकऐवजी रिषभलाच संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे. त्याचा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे संघात समावेश करण्यात आला नव्हता. पण, त्याला ट्वेंटी-20 व वन डे संघात स्थान देण्यात आले आहे. धोनीला बॅक अप यष्टिरक्षक म्हणून पंत व कार्तिक यांच्यापैकी एकाचा वर्ल्ड कप संघात समावेश होणे अपेक्षित आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील कामगिरीवर त्यांचे भवितव्य अवलंबून आहे.
विर्दभ संघाकडून रणजी करंडक स्पर्धेत दमदार कामगिरी करणाऱ्या उमेश यादवचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. चौथा जलदगती गोलंदाज म्हणून वर्ल्ड कप संघात त्याचा विचार केला जाऊ शकतो. त्यामुळे रविवारच्या सामन्यात त्याला संधी मिळू शकते. मयांक मार्कंडे उद्या भारतीय संघाकडून पदार्पण करू शकतो. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेला ट्वेंटी-20 सामन्याने 24 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. दोन सामने अनुक्रमे विशाखापट्टणम व बंगळुरु येथे होतील. पाच सामन्यांची वन डे मालिका 2 मार्चपासून सुरु होईल आणि पहिला सामना हैदराबाद येथे होईल. त्यानंतर नागपूर ( 5 मार्च), रांची ( 8 मार्च), मोहाली ( 10 मार्च ) व दिल्ली ( 13 मार्च ) असे सामने होतील. दुसरीकडे ऑस्ट्रेलिया मार्च व एप्रिलमध्ये पाकिस्तानविरुद्ध मालिका खेळणार आहे.
असा असेल भारतीय संघ : लोकेश राहुल, शिखर धवन, विराट कोहली, रिषभ पंत, महेंद्रसिंग धोनी, विजय शंकर, कृणाल पांड्या, जस्प्रीत बुमराह, युजवेंद्र चहल, उमेश यादव, मयांक मार्कंडे.
Web Title: India vs Australia 1st T20I: Rohit Sharma OUT, Lokesh Rahul IN? India ready for the first Twenty20
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.