बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेत पर्थमध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटीमध्ये भारतीय संघ विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. भारताने दिलेल्या ५३४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने चौथ्या दिवशी उपाहारापर्यंत ५ बाद १०४ धावांपर्यंत मजल मारली असून, टीम इंडियाला आता विजयासाठी ५ विकेट्सची आवशकता आहे.
खेळाच्या चौथ्या दिवशी आज ऑस्ट्रेलियाने कालच्या ३ बाद १२ धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केल्यानंतर काही वेळातच ऑस्ट्रेलियाला चौथा धक्का बसला. मोहम्मद सिराज याने उस्मान ख्वाजा याला ऋषभ पंतकडे झेल देण्यास भाग पाडत भारतीय संघाला चौथं यश मिळवून दिलं. उस्मान ख्वाजाला केवळ ४ धावाच करता आल्या.
यजमान ऑस्ट्रेलियन संघाचे ४ फलंदाज अवघ्या १७ धावांत माघारी परतल्यानंतर अनुभवी स्टिव्हन स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेड यांनी डाव सावरला. दोघांनीही पाचव्या विकेटसाठी ६२ धावांची भागीदारी केली. मात्र सावध खेळत असलेला स्टिव्हन स्मित अखेर सिराजच्या गोलंदाजीवर चकला आणि पंतकडे झेल देवून माघारी परतला. स्मिथने १७ धावा काढल्या. त्यानंतर एक बाजू लावून धरणाऱ्या ट्रॅव्हिस हेडने आपलं अर्धशतक पूर्ण करतानाच मिचेल मार्शच्या साथीने अधिक पडझड होऊ न देता संघाला शंभरीपार पोहोचवले. उपाहाराला खेळ थांबला तेव्हा ट्रॅव्हिस हेड ६२ आणि मिचेल मार्श ५ धावांवर खेळत होते.
तत्पूर्वी काल खेळाच्या तिसऱ्या दिवशी यशस्वी जयस्वालचं दीडशतक आणि विराट कोहलीच्या दमदार शतकाच्या जोरावर भारताने ६ बाद ४८७ धावांवर आपला डाव घोषित करून ऑस्ट्रेलियासमोर ५३४ धावांचं आव्हान ठेवलं. त्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची तिसऱ्या दिवस अखेर ३ बाद १२ अशी अवस्था झाली होती.