India vs Australia, 1st Test, 3rd Day : पहिल्या डावात ५३ धावांची आघाडी घेणारा भारतीय संघ दुसऱ्या डावात यजमान ऑस्ट्रेलियासमोर किमान आव्हानात्मक धावसंख्या उभी करेल असे वाटले होते. पण, जोश हेझलवूड व पॅट कमिन्स या जोडीनं जो दणका दिला.त्यातून टीम इंडियाला सावरताच आले नाही. टीम इंडिया पहिली कसोटी जिंकेल, असा दावा करणारे तोंडावर पडले. भारताच्या एकाही फलंदाजाला दुसऱ्या डावात दुहेरी आकडा गाठता आला नाही. शिवाय कसोटी क्रिकेटमधील भारताची ही सर्वात निचांक कामगिरी ठरली. ऑस्ट्रेलियानं पहिली कसोटी ८ विकेट्स राखून जिंकली आणि चार सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात ४२ धावा झाल्या, तर ८ फलंदाज माघारी परतले. भारताचा दुसरा डाव ३६ धावांवर गडगडला आणि ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी माफक ९० धावांचे लक्ष्य राहिले. मोहम्मद शमी रिटायर्ड हर्ट झाल्यानं भारताला ९ बाद ३६ धावांवर खेळ थांबवावा लागला. दुसऱ्या दिवसअखेर भारतानं दुसऱ्या डावात १ बाद ९ धावा करताना आघाडी ६२ धावांपर्यंत वाढवली. तिसऱ्या दिवशी बुमराह ( २) पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर माघारी परतला. पहिल्या डावात टीम इंडिला सावरणारा चेतेश्वर पुजारा भोपळाही फोडू शकला नाही. कमिन्सच्या इनस्वींग चेंडूंन त्याला बाद केले.
पुढच्याच षटकात जोश हेझलवूडनं मयांक ( ९) आणि अजिंक्य रहाणे ( ०) यांना बाद करून टीम इंडियाची अवस्था ५ बाद १५ अशी दयनीय केली. पॅट कमिन्सनं पुढच्या षटकात टीम इंडियाला मोठा धक्का दिला. विराट कोहली ४ धावांवर माघारी परतला. पदार्पणवीर कॅमेरून ग्रीननं अविश्वसनीय झेल घेताना विराटला चलते केले. टीम इंडियाची अवस्था ६ बाद १९ अशी झाली. १९व्या षटकात जोश हेझलवूडनं पुन्हा सलग दोन चेंडूंत दोन धक्के दिले. वृद्धीमान सहा व आर अश्विन हे बाद झाल्यानंतर टीम इंडियाची हालत ८ बाद २६ अशी झाली. मोहम्मद शमी रिटायर्ड हर्ट झाल्यानं भारताचा डाव ९ बाद ३६ धावांवर संपुष्टात आला.
९० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मॅथ्यू वेड व जो बर्न यांनी पहिल्या विकेटसाठी ७० धावांचा मजबूत पाया रचला. वेड ३३ धावांवर धावबाद झाला. जो बर्न ६३ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारासह ५१ धावांवर नाबाद राहिला. मार्नस लाबुशेन ६ धावांवर बाद झाला. कसोटी क्रिकेटमध्ये मागील २५ सामन्यांत नाणेफेक जिंकून विराट कोहलीला एकही पराभव पत्करावा लागला नव्हता. पण, आज ती विजयी मालिकाही खंडित झाली.