ठळक मुद्देअॅडलेड कसोटीचा पहिला दिवस गाजवला तो चेतेश्वर पुजाराने... पुजाराे 123 धावांसह ऑस्ट्रेलियात पहिले शतक झळकावलेत्याने कसोटीतील 5000 धावांचा पल्लाही ओलांडला
अॅडलेड, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : अॅडलेड कसोटीचा पहिला दिवस गाजवला तो चेतेश्वर पुजाराने... एकिकडे खराब फटके मारून भारताचे फलंदाज यजमान ऑस्ट्रेलियाला विकेट भेट देत होते, परंतु पुजाराने जबाबदारीने खेळ करताना भारताला संघात कमबॅक करून दिले. पुजाराने 123 धावांची महत्त्वपूर्ण खेळी करताना संघाला पहिल्या दिवसअखेर 9 बाद 250 धावांपर्यंत मजल मारून दिली. दुर्दैवाने दिवसाच्या 88 व्या षटकात पुजाराला धावबाद होऊन माघारी परतावे लागले. पुजाराने आजच्या सामन्यात ऑस्ट्रेलियात पहिले शतक झळकावले. कसोटी कारकिर्दीतील त्याचे हे 16 वे शतक ठरले आणि याचबरोबर त्याने 5000 धावांचा पल्लाही ओलांडला. या कामगिरीसह पुजाराने 'द वॉल' राहुल द्रविडच्या पावलावर पाऊल ठेवला. पुजाराची ही खेळी द्रविडच्या अॅडलेडवरील 233 धावांच्या अविस्मरणीय खेळीची आठवण करून देणारी ठरली. द्रविडने दुसऱ्या डावात 233 धावा चोपताना भारताला 2003-04 च्या दौऱ्यात ऐतिहासिक विजय मिळवून दिला होता. पुजाराच्या आजच्या खेळीने त्या आठवणींना उजाळा दिला. पुजाराने 246 चेंडूंत 7 चौकार व 2 षटकारांसह 123 धावा केल्या. 88 व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर पॅट कमिन्सने त्याची ही खेळी संपुष्टात आणली. 2018 मधील पुजाराचे हे दुसरे शतक आहे. त्याने इंग्लंड व ऑस्ट्रेलिया येथे शतक झळकावले होते आणि या दोन्ही वेळेला तो धावबाद झाला होता. पुजाराने या सामन्यात कसोटीतील 5000 धावा पूर्ण केल्या. हा पल्ला ओलांडण्यासाठी पुजाराने 108 डाव खेळले. 5000 धावांचा पल्ला पार करणारा तो भारताचा पाचवा जलद फलंदाज ठरला. सुनील गावसकर ( 95 डाव), वीरेंद्र सेहवाग (99 डाव), सचिन तेंडुलकर (103 डाव) आणि विराट कोहली ( 105 डाव) यांनी सर्वात जलद 5000 धावा केल्या आहेत. यासह पुजाराने द्रविडच्या विक्रमाची बरोबरी केली. द्रविडनेही 108 डावांत 5000 धावांचा पल्ला पार केला होता. हा योगायोग येथेच थांबत नाही. त्याने याआधी द्रविडच्या 3000 आणि 4000 धावांच्या विक्रमांशी बरोबरी केली होती. द्रविडने 67 डावांत 3000 आणि 84 डावांत 4000 धावांचा टप्पा ओलांडला होता. पुजारालाही तितक्याच डावा लागल्या. पुजाराने येथे शतकी खेळी करताना आणखी एक पराक्रम नावावर केला. आशिया खंडाबाहेर कसोटीच्या पहिल्या दिवशी शतक करणारा तो भारताचा सहावा फलंदाज ठरला आहे. याआधी विजय मांजरेकर ( 133 लीड्स 1952 ), सचिन तेंडुलकर ( 155 ब्लोएफोंटेन, 2001), वीरेंद्र सेहवाग ( 105 ब्लोएफोंटेन, 2001) , विराट कोहली ( 119 जोहान्सबर्ग, 2013), मुरली विजय ( 122 ट्रेंट ब्रिज, 2014), विराट कोहली ( 143, नॉर्थ साउंड, 2016) यांनी अशी कामगिरी केली आहे.