ठळक मुद्देचेतेश्वर पुजारा व विराट कोहली या जोडीनं टीम इंडियाचा डाव सावरलाविराट कोहलीच्या अर्धशतकी खेळीला अजिंक्य रहाणेनं दिली तुल्यबळ साथअजिंक्य रहाणेच्या चुकीनं भारताची सामन्यावरील पकड निसटली
शुबमन गिल आणि लोकेश राहुल यांच्याऐवजी टीम इंडियानं अंतिम ११ मध्ये पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) याला खेळवण्याचा निर्णय फसला. मिचेल स्टार्कनं पहिल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर पृथ्वीचा त्रिफळा उडवला. त्यानंतर मयांक अग्रवाल व चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara) टीम इंडियाला मोठी मजल मारून देतील असे वाटले होते, परंतु अग्रवालही अपयशी ठरला. पण, पुजारानं कर्णधार विराट कोहलीसह ( Virat Kohli) पहिला दिवस गाजवला. पुजारा अर्धशतकापासून वंचित राहिला असला तरी विराटनं दुसऱ्या बाजूनं कॅप्टन्स नॉक खेळून टीम इंडियाला समाधानकारक मजल मारून दिली. अजिंक्य रहाणेनेही ( Ajinkya Rahane) दमदार खेळ केला. पण, रहाणेच्या एका चुकीच्या कॉलनं विराटला शतकपासून वंचित ठेवले. त्यानंतर टीम इंडियाची सामन्यावरील पकडही निसटली.
पृथ्वी शॉ ( ०) आणि मयांक अग्रवाल ( १७) हे झटपट माघारी परतल्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली यांनी टीम इंडियाचा डाव सावरला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ६८ धावांची भागीदारी केली. १९१ चेंडूंतील ६८ धावांची भागीदारी ५०व्या षटकात संपुष्टात आली. नॅथनच्या गोलंदाजीवर गलीवर उभ्या असलेल्या मार्नस लाबुशेननं झेल टिपून पुजाराला माघारी जाण्यास भाग पाडले. मैदानावरील पंचांनी नाबाद देताच ऑसी संघानं DRSघेतला आणि त्यात चेंडू बॅटवर आदळल्याचे स्पष्ट दिसत होते. पुजारा १६० चेंडूंत २ चौकारांसह ४३ धावांवर माघारी परतला. १७ धावांवर असताना विराटला दिलेलं जीवदान ऑस्ट्रेलियाला महागात पडले.
विराटनं संयमी खेळ करताना अर्धशतक पूर्ण केले. कसोटी क्रिकेटमधील त्याचे हे २३वे अर्धशतक ठरले. ७२ वी धाव घेताच अॅडलेडवर विराट कोहलीनं ओलांडला ५०० धावांचा पल्ला. या मैदानावर सर्वाधिक धावा करणारा चौथा परदेशी फलंदाज. ब्रायन लारा ( ६१० धावा), सर जॅक हॉब्स ( ६०१ धावा) आणि सर व्हिव्हियन रिचर्ड्स ( ५५२ धावा) हे आघाडीवर आहेत. विराटनं चौथ्या विकेटसाठी अजिंक्य रहाणेसह अर्धशतकी भागीदारी केली. ही जोडी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा समाचार घेत होती. विराट या वर्षाच्या अखेरच्या कसोटीत शतकी खेळी करेल असा विश्वास होता, परंतु ७७व्या षटकात अजिंक्यनं चुकीचा कॉल दिल्यानं त्याला माघारी जाण्यास भाग पाडले. नॅथनच्या गोलंदाजीवर अजिंक्यनं फटका मारला आणि एक धाव घेण्यासाठी कॉल दिला, परंतु विराट खेळपट्टीच्या मधोमध आल्यानंतर त्यानं माघारी जाण्यास सांगितले. तोपर्यंत जोश हेझलवूडनं चेंडू नॅथनकडे सोपवला होता आणि विराट १८० चेंडूंत ८ चौकारांसह ७४ धावांवर माघारी परतला. या चुकीनंतर अजिंक्य दडपणाखाली दिसला आणि मिचेल स्टार्कनं त्याला पायचीत केले. अजिंक्य ९२ चेंडूंत १ षटकार व ३ चौकारासह ४२ धावांवर बाद झाला. विराटची विकेट टर्नींग पॉईंट ठरली आणि टीम इंडियानं पहिल्या सामन्यावर घेतलेली पकड गमावली. हनुमा विहारी ( १६) पायचीत झाला. भारतानं दिवसअखेर ६ बाद २३३ धावा केल्या.