कर्णधार विराट कोहलीच्या विकेटनं भारतीय डावाला मिळालेल्या टर्निंग पॉईंटनं यजमान ऑस्ट्रेलियानं पहिल्या कसोटीत कमबॅक केले. विराटच्या विकेटनंतर टीम इंडियाची गाडी रुळावरून घसरली, ती दुसऱ्या दिवशीही तशीच राहिली. दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या दोन षटकांत आर अश्विन व वृद्धीमान सहा हे भरवशाचे खेळाडू माघारी परतले अन् ऑस्ट्रेलियानं सहज शेपूट गुंडाळले. अवघ्या २५ चेंडूत ऑस्ट्रेलियानं टीम इंडियाचा पहिला डाव दुसऱ्या दिवशी गुंडाळला. धावफलकावर १८८ धावा असताना विराट कोहली माघारी परतला आणि त्यानंतर अवघ्या ५६ धावांत ७ विकेट्स पडल्या.
पहिल्या दिवशीची खेळपट्टी फलंदाजांसाठी आव्हानात्मक होती. सुरुवातीला चेतेश्वर पुजारा व त्यानंतर कोहली यांनी संयमी फलंदाजी केली. कोहलीने आपल्या खेळीत १८० चेंडू खेळले, तर पुजाराने १६० चेंडूंना सामोरे जाताना ४३ धावा केल्या. रहाणेने ९१ चेडूंमध्ये ४२ धावांची खेळी केली. कोहली व रहाणे यांनी तिसऱ्या सत्रात ८८ धावांची भागीदारी करीत भारताला दमदार धावसंख्या उभारून देण्याच्या दिशेने वाटचाल केली होती, पण कोहली बाद झाला. त्यानंतर रहाणेला स्टार्कने माघारी परतवले. पुजारानं तिसऱ्या विकेटसाठी कोहलीसोबत ६८ धावांची भागीदारी केली, पण त्याला दडपण झुगारता आले नाही. अजिंक्य रहाणेच्या YES/NOनं ऑसींना मिळवून दिली विराट कोहलीची विकेट, Video
विराट १८० चेंडूंत ८ चौकारांसह ७४ धावांवर माघारी परतला. या चुकीनंतर अजिंक्य दडपणाखाली दिसला आणि मिचेल स्टार्कनं त्याला पायचीत केले. अजिंक्य ९२ चेंडूंत १ षटकार व ३ चौकारासह ४२ धावांवर बाद झाला. विराटची विकेट टर्नींग पॉईंट ठरली आणि टीम इंडियानं पहिल्या सामन्यावर घेतलेली पकड गमावली. हनुमा विहारी ( १६) पायचीत झाला. भारतानं दिवसअखेर ६ बाद २३३ धावा केल्या होत्या. आज अवघ्या ११ धावांची भर घालून टीम इंडियाचा पहिला डाव २४४ धावांवर गडगडला. मिचेल स्टार्कनं ५३ धावांत ४ विकेट्स घेतल्या, तर पॅट कमिन्सनं ४८ धावांत ३ फलंदाज माघारी पाठवले.