India vs Australia, 1st Test : टीम इंडियाच्या फलंदाजांनी पहिल्या कसोटीत निराशाजनक कामगिरी केली. चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे वगळता अन्य फलंदाजांनी ऑसी गोलंदाजांसमोर नांगी टाकली. पुजारासह अर्धशतकी भागीदारीनंतर कोहलीनं चौथ्या विकेटसाठी रहाणेसह सॉलीड भागीदारी केली. पण, रहाणेच्या चुकीच्या कॉलनं कोहली धावबाद झाला अन् टीम इंडियाचा डाव गडगडला. पहिल्या दिवसाच्या धावसंख्ये अवघ्या ११ धावांची भर घालून टीम इंडियाचा पहिला डाव २४४ धावांवर गडगडला. कोहलीच्या विकेटसह टीम इंडियाचे ७ फलंदाज ५६ धावांवर माघारी परतले.
पहिल्या दिवशीची खेळपट्टी फलंदाजांसाठी आव्हानात्मक होती. सुरुवातीला चेतेश्वर पुजारा व त्यानंतर कोहली यांनी संयमी फलंदाजी केली. पुजाराने १६० चेंडूंना सामोरे जाताना ४३ धावा केल्या. रहाणेने ९१ चेडूंमध्ये ४२ धावांची खेळी केली. कोहली व रहाणे यांनी तिसऱ्या सत्रात ८८ धावांची भागीदारी करीत भारताला दमदार धावसंख्या उभारून देण्याच्या दिशेने वाटचाल केली होती, पण कोहली बाद झाला. त्यानंतर रहाणेला स्टार्कने माघारी परतवले. विराट १८० चेंडूंत ८ चौकारांसह ७४ धावांवर माघारी परतला.
या चुकीनंतर अजिंक्य दडपणाखाली दिसला आणि मिचेल स्टार्कनं त्याला पायचीत केले. अजिंक्य ९२ चेंडूंत १ षटकार व ३ चौकारासह ४२ धावांवर बाद झाला. विराटची विकेट टर्नींग पॉईंट ठरली आणि टीम इंडियानं पहिल्या सामन्यावर घेतलेली पकड गमावली. हनुमा विहारी ( १६) पायचीत झाला. भारतानं दिवसअखेर ६ बाद २३३ धावा केल्या होत्या. आज अवघ्या ११ धावांची भर घालून टीम इंडियाचा पहिला डाव २४४ धावांवर गडगडला. ऑस्ट्रेलियालाही सावध सुरूवातीनंतर जसप्रीत बुमराहनं पहिला धक्का दिला. मॅथ्यू वेडला त्यानं पायचीत केलं, त्याच षटकात मार्नस लाबुशेनचा झेल यष्टिरक्षकाकडून सुटला.
पण, या सामन्यात मोहम्मद शमी फाटलेल्या बुटासह गोलंदाजी करताना दिसला. त्यानं स्वतःहून त्याच्या डाव्या बुटाला अंगठ्याच्या इथे छिद्र पाडल्याचे पाहायला मिळाले. त्यामागे एक कारण आहे. गोलंदाजी करताना डावा पाय जमीनीवर लँड झाल्यानंतर अंगठ्यावर प्रेशर येऊ नये म्हणून शमीनं तो छिद्र केला आहे.