India vs Australia, 1st Test : भारतीय गोलंदाजांनी यजमान ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरच्या मैदानावर बॅकफुटवर जाण्यास भार पाडले. टिच्चून मारा करताना भारतीय गोलंदाजांनी सातत्यानं ऑसी फलंदाजांवर दडपण निर्माण केलं. जसप्रीत बुमराह, उमेश यादव व आर अश्विन यांनी ऑसींना धक्के दिले. भारतीय खेळाडूंनी ५-६ झेल सोडले नसते तर ऑस्ट्रेलियाची अवस्था आणखी बिकट झाली असती. ऑसी कर्णधार टीम पेन याच्या नाबाद ७३ धावांच्या खेळीमुळे टीम इंडियाला मोठी आघाडी घेण्यापासून रोखले. पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) दुसऱ्या डावातही अपयशी ठरला. अवघ्या चार धावांवर तो माघारी परतला.
पहिल्या दिवसाच्या ६ बाद २३३ धावसंख्येत अवघ्या ११ धावांची भर घालून टीम इंडियाचा पहिला डाव २४४ धावांवर गडगडला. मिचेल स्टार्कनं सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या, तर पॅट कमिन्सने तीन आणि जोश हेझलवूड व नॅथन लियॉन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. ऑस्ट्रेलियालाही सावध सुरूवातीनंतर जसप्रीत बुमराहनं धक्के दिले. मॅथ्यू वेड ( ८) व जो बर्न्स ( ८) यांना बुमराहनं पायचीत केलं. भारतीय क्षेत्ररक्षकांनी मार्नस लाबुशेन व स्टीव्ह स्मिथ यांचे झेल सोडले. लाबुशेन व स्मिथ ही जोडी डोईजड होईल असे वाटत असताना विराटनं चेंडू आर अश्विनच्या ( R Ashwin) हाती सोपवला आणि त्यानं यश मिळवून दिलं. अश्विननं सुरुवातीला स्मिथला ( १) स्लीपमध्ये झेलबाद केलं, त्यानंतर स्वतःच्याच गोलंदाजीवर ट्रॅव्हीस हेडचा ( ७) झेल टिपला. त्यानंतर अश्विननं पदार्पणवीर कॅमेरून ग्रीनला (११) माघारी पाठवले.
भारतासाठी घातकी ठरू पाहणाऱ्या मार्नस लाबुशेनला चहापानाच्या ब्रेकनंतर उमेश यादवनं ( Umesh Yadav) बाद केले. लाबुशेन ११९ चेंडूंत ७ चौकारासह ४७ धावा केल्या. त्याच षटकात पॅट कमिन्सला ( ०) माघारी पाठवून यादवनं ऑसींना आणखी एक धक्का दिला. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १९१ धावांवर गुंडाळून टीम इंडियानं ५३ धावांची आघाडी घेतली. कर्णधार टीम पेननं ( Tim Pain) एकाकी खिंड लढवताना अर्धशतकी खेळी केली. पेन ९९ चेंडूंत १० चौकारांसह ७३ धावांवर नाबाद राहिला. अश्विननं ४ विकेट्स घेतल्या. उमेश यादवने तीन, तर जसप्रीत बुमराहनं दोन विकेट्स घेतल्या.
भारताचे ७ फलंदाज ५३ धावांवर माघारी परतले असताना दुसरीकडे ऑस्ट्रेलियाच्या तळाच्या पाच फलंदाजांनी ५ बाद ७९ वरून संघाला १९१ धावा उभारून दिल्या. तळाच्या पाच फलंदाजांनी ११२ धावा जोडल्या. दुसऱ्या दिवसअखेर भारतानं दुसऱ्या डावात १ बाद ९ धावा करताना आघाडी ६२ धावांपर्यंत वाढवली.
Web Title: India vs Australia, 1st Test : India finishes Day 2 with 9/1 with the lead of 62 runs. Prithvi Shaw the only wicket to fell for India
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.