ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज शेन वॉर्न ( Shane Warne) वादात अडकला आहे. भारत-ऑस्ट्रेलिया पहिल्या कसोटीत समालोचन करणाऱ्या वॉर्ननं भारतीय फलंदाज चेतेश्वर पुजारासाठी ( Cheteshwar Pujara) एक टोपणनाव वापरले आणि त्याचे ते नाव चर्चेचा विषय ठरले आहे. यॉर्कशायर क्लबकडून खेळणाऱ्या पुजाराला त्याचे सहकाही या नावानं बोलवायचे. चेतेश्वर पुजाराचे नाव उच्चारण्यास अवघड असल्यानं त्याला स्टीव्ह असं टोपणनाव दिलं गेलं होतं.
पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी वॉर्ननं त्या नावाचा उच्चार केला, परंतु भारतीय चाहते खवळले आणि हे नाव देण्यामागे वर्णद्वेषी कारण असल्याचा दावा करून त्यांनी वॉर्नकडे माफीची मागणी केली. यॉर्कशायरचा क्रिकेटपटू अझीम रफीक यांनी नुकताच क्लबमध्ये भेदभाव होत असल्याचा दावा केला होता. यॉर्कशायरचा माजी कर्मचारी ताज बट यानेही रफिकच्या दाव्यात तथ्य असल्याचे सांगितले होते. कृष्णवर्णीय खेळाडूला यॉर्कशायर क्लबचे अन्य खेळाडू स्टीव्ह म्हणूनच बोलवायचे, असे बटने सांगितले. जेव्हा चेतेश्वर पुजारानं हा क्लब जॉईन केला, तेव्हा त्यालाही याच नावानं उच्चारलं गेलं. कारण त्याचं नाव त्यांना उच्चारण्यास कठीण जात होते, असेही बटने सांगितले.
त्यामुळे वॉर्ननं या नावाचा उल्लेख केल्यानं नेटिझन्स भडकले आहेत. पुजारा १६० चेंडूंत २ चौकारांसह ४३ धावांवर माघारी परतला.