India vs Australia, 1st Test, 3rd Day : १ बाद ९ अशा धावांवरून सुरुवात करणाऱ्या टीम इंडियाचा डाव ३६ धावांवर गडगडला. ऑस्ट्रेलियानं विजयासाठीचे ९० धावांचे लक्ष्य ८ विकेट्स राखून पूर्ण केले आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. या मानहानिकारक पराभवानंतर टीम इंडियाला मोहम्मद शमीच्या ( Mohammed Shami) रुपानं आणखी एक धक्का बसेल का, अशी चिंता निर्माण झाली आहे. कमिन्सच्या गोलंदाजीवर शमीच्या डावा हाताला दुखापत झाली आणि रिटायर्ड हर्ट होत तो माघारी परतला. तो मैदानावर परत आलाच नाही. सामन्यानंतर कर्णधार विराट कोहलीनं ( Virat Kohli) शमीच्या दुखापतीबाबत अपडेट्स दिले.
पहिल्या डावात ५३ धावांची आघाडी घेणारा भारतीय संघ दुसऱ्या डावात यजमान ऑस्ट्रेलियासमोर किमान आव्हानात्मक धावसंख्या उभी करेल असे वाटले होते. टीम इंडिया पहिली कसोटी जिंकेल, असा दावा करणारे तोंडावर पडले. भारताच्या एकाही फलंदाजाला दुसऱ्या डावात दुहेरी आकडा गाठता आला नाही. शिवाय कसोटी क्रिकेटमधील भारताची ही सर्वात निचांक कामगिरी ठरली. ऑस्ट्रेलियानं पहिली कसोटी ८ विकेट्स राखून जिंकली आणि चार सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
भारताचा दुसरा डाव ३६ धावांवर गडगडला आणि ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी माफक ९० धावांचे लक्ष्य राहिले. मोहम्मद शमी रिटायर्ड हर्ट झाल्यानं भारताला ९ बाद ३६ धावांवर खेळ थांबवावा लागला. तिसऱ्या क्रमांकावर आलेला बुमराह ( २) माघारी परतला. त्यानंतर अन्य फलंदाजांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती, परंतु तेही अपयशी ठरले. चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे भोपळाही फोडू शकले नाहीत. आर अश्विनही शून्यावर बाद झाला. विराट कोहली ( ४), पृथ्वी शॉ ( ४), हनुमा विहारी (८), वृद्धीमान सहा ( ४), उमेश यादव ( ४*) हेही एकेरी धावसंख्येवर बाद झाले. भारताकडून मयांक अग्रवालनं दुसऱ्या डावात सर्वाधिक ९ धावा केल्या. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच टीम इंडियाचा एकही शिलेदार दुहेरी धावसंख्या करू शकला नाही. २२व्या षटकात मोहम्मद शमी रिटायर्ड हर्ट झाल्यानं भारताचा डाव ९ बाद ३६ धावांवर संपुष्टात आला.
९० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मॅथ्यू वेड व जो बर्न यांनी पहिल्या विकेटसाठी ७० धावांचा मजबूत पाया रचला. वेड ३३ धावांवर धावबाद झाला. जो बर्न ६३ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारासह ५१ धावांवर नाबाद राहिला. मार्नस लाबुशेन ६ धावांवर बाद झाला. सामन्यानंतर विराटनं सांगितले की,''शमीबद्दल अद्याप मलाही काहीच माहिती मिळालेली नाही. त्याच्या दुखापतीचं स्कॅनिंग होईल. त्याला प्रचंड वेदना होत होत्या आणि तो हातही हलवू शकत नव्हता. सायंकाळी त्याच्याबद्दलची अपडेट्स समजतील.''