पहिल्या कसोटीत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. शुबमन गिल आणि लोकेश राहुल यांच्याऐवजी अंतिम ११मध्ये पृथ्वी शॉला संधी दिल्यानं सर्वांना आश्चर्य वाटले होते. पृथ्वीनंही अपयशाचा पाढा पुन्हा वाचला आणि मिचेल स्टार्कनं पहिल्याच षटकात त्याला माघारी जाण्यास भाग पाडले. लंच ब्रेकपर्यंत भारताचे दोन फलंदाज ४१ धावांवर माघारी परतले होते. चेतेश्वर पुजारा व मयांक अग्रवाल यांनी टीम इंडियाचा डाव सावरला होता, परंतु पॅट कमिन्सच्या एका अप्रतिम चेंडूनं मयांकचा त्रिफळा उडवला. तो ४० चेंडूंत २ चौकारासह १७ धावांवर माघारी परतला. त्यानंतर विराट कोहली ( Virat Kohli)नं चेतेश्वर पुजारासह टीम इंडियाचा डाव सावरला आहे.
३५व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर विराट झेलबाद होता, परंतु यष्टिरक्षक टीम पेननं DRSनं घेतल्यानं त्याला जीवदान मिळालं. नॅथन लियॉननं टाकलेल्या चेंडूं तिसऱ्या यष्टींमागून बाहेर जात होता आणि तो विराटच्या ग्लोजला हलकासा घासून पेनच्या हाती विसावला. मॅथ्यू वेडनं DRS घेण्याची मागणी केली, परंतु पेननं तो घेतला नाही. रिप्लेत चेंडू विराटच्या ग्लोजला हलकासा घासल्याचे दिसले. ऑस्ट्रेलियानं मोठी विकेट गमावली.