अॅडलेड, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : अॅडलेड ओव्हल कसोटीत भारताला अपेक्षित सुरुवात करता आली नाही. उपहारापर्यंत भारताचे चार फलंदाज अवघ्या 41 धावांवर माघारी परतले होते. लोकेश राहुल, मुरली विजय, अजिंक्य रहाणे व कर्णधार विराट कोहली यांना चुकीच्या शॉट्स सिलेक्शनमुळे माघारी परतावे लागले. बाहेर जाणाऱ्या चेंडूवर फटका मारण्याचा मोह भारतीय फलंदाजांनी येथे आवरता आला नाही. निराशाजनक सुरुवातीनंतर चेतेश्वर पुजारा आणि कसोटी संघात पुनरागमन करणारा रोहित शर्मा भारताचा डाव सांभाळेल असे वाटत होते. पण, रोहितचा एक चुकीचा फटका महागात पडला आणि सोशल मीडियावर त्याची चांगलीच खिल्ली उडवण्यात आली.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटीला आजपासून सुरुवात झाली. मात्र, भारताचे 4 फलंदाज अवघ्या 41 धावांवर माघारी फिरले होते. पाचव्या विकेटसाठी पुजारा व रोहित यांनी काही काळ खिंड लढवली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 45 धावा जोडल्या आणि त्यात रोहितच्या 37 धावा होत्या. मिळालेल्या संधीचं सोनं करण्यासाठी उत्सुक असलेल्या रोहितला बराच वेळ खेळपट्टीव टिकून राहिल्यानंतर फटकेबाजीचा मोह झाला. पण, पुढच्याच ठेस मागचा शहाणा... हे तो विसरला. भारताच्या फलंदाजांना चुकीच्या फटक्यांमुळे बाद व्हावे लागले होते. रोहितकडून तशी चुक होणे अपेक्षित नव्हते, परंतु घडायचे ते घडलेच... नॅथन लियॉनच्या गोलंदाजीवर षटकार खेचल्यानंतर रोहित पुढच्या चेंडूवर फटका मारण्यासाठी आला आणि तिथेच त्याचा घात झाला.