नागपूर, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा सामना सुरु होण्यापूर्वी एक घटना घडली. ज्या घटनेमुळे सध्याच्या घडीला क्रिकेट विश्वात बरीच चर्चा सुरु आहे. ही गोष्ट घडली ती टॉस करताना. भारताचा कर्णधार विराट कोहली, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंच, सामनाधिकारी रंजन मदुगले आणि समालोचक संजय मांजरेकर हे उपस्थित होते. त्यावेळी हा प्रकार घडल्याचे पाहायला मिळाले.
कोहलीच्या हातात नाणे होते. मांजरेकर यांनी सांगितल्यावर कोहलीने ते नाणे हवेत भिरकावले. त्यावेळी फिंचने 'हेड्स' असा कॉल दिला. हवेत भिरकावलेले नाणे यावेळी मैदानात पडले आणि मदुगले यांच्या डाव्या पायाला लागले. त्यानंतर त्यांनी फिंचने नाणेफेक जिंकल्याचे जाहीर केले. पण यानंतर ही नाणेफेक योग्य होती का, यावरून क्रिकेट चाहत्यांमध्ये आता चर्चा सुरु झाली आहे.
ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या सामन्यात घेतली मोठी रीस्कभारताविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ कमी जोखीम उचलेल, असे वाटत होते. पण ऑस्ट्रेलियाने या गोष्टींच्या उलट या सामन्यात मोठी रीस्क घेतल्याचे पाहायला मिळाले आहे.
दुसरा सामना सुरु होण्यापूर्वी भारताचे माजी कर्णधार आणि समालोचक सुनील गावस्कर यांनी खेळपट्टीची पाहणी केली होती. त्यानंतर या खेळपट्टीबाबत त्यांनी आपले मत व्यक्त केले होते. गावस्कर या खेळपट्टीबाबत म्हणाले होते की, " जामठाच्या खेळपट्टीवर बऱ्याच भेगा आहेत. त्यामुळे या खेळपट्टीवर जो संघ नाणेफेक जिंकेल त्यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घ्यायला हवा. कारण या खेळपट्टीवरील भेगा खेळ सुरु झाल्यावर वाढत जातील आणि त्यामुळे दुसऱ्या डावात फलंदाजी करणे सोपे असणार नाही."
नाणेफेकीपूर्वी दोन्ही कर्णधारांनी खेळपट्टी पाहिली होती. खेळपट्टीवरील भेगा दोन्हीही कर्णधारांनी पाहिल्या होत्या. या सामन्यातील नाणेफेकीचा कौल ऑस्ट्रेलियाच्या बाजूने लागला. त्यावेळी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंच हा फलंदाजी स्वीकारेल, असे वाटले होते. पण फिंचने यावेळी भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले आणि मोठी रीस्क घेतल्याचे चाहत्यांनी म्हटले आहे.