अॅडलेड, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : यजमान ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या वन डे सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, अॅलेक्स करी आणि अॅरोन फिंच यांना पुन्हा एकदा मोठी खेळी साकारण्यात अपयश आले. मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार यांनी ऑस्ट्रेलियाला 26 धावांवर दोन धक्के दिले. त्यानंतर उस्मान ख्वाजा आणि शॉन मार्श यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला, परंतु रवींद्र जडेजाने अफलातून फिल्डींग करताना ही सेट जोडी तोडली. जडेजाच्या या फिल्डींगचे सोशल मीडियावर भरभरून कौतुक झाले.
सिडनी वन डेतील विजयानंतर ऑस्ट्रेलियाचे मनोबल चांगलेच उंचावले आहे. त्यामुळे दुसऱ्या वन डेत विजय मिळवून मालिका खिशात घालण्याचा निर्धार त्यांनी केला होता. मात्र, त्यांचे सलामीवीर अवघ्या 26 धावांवर माघारी परतले आणि ते अडचणीत आले. ख्वाजा आणि मार्श ही जोडी पुन्हा एकदा संघासाठी धावली. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 56 धावांची भागीदारी करून ऑस्ट्रेलियाला सुस्थितीत आणले. मात्र, जडेजाने अफलातून क्षेत्ररक्षण करताना ही जोडी संपुष्टात आणली. कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर चोरटी धाव घेण्याचा प्रयत्नात असलेल्या ख्वाजाला जडेजाने धावबाद केले. त्याने थेट यष्टिंचा वेध घेत ख्वाजाला माघारी जाण्यास भाग पाडले.पाहा व्हिडीओ...