अॅडलेड, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या वन डे सामन्यात 9 बाद 298 धावा चोपल्या. शॉन मार्श ( 131) आणि ग्लेन मॅक्सवेल ( 48) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने हा डोंगर उभा केला. त्यामुळे भारताला मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी 299 धावांचा पाठलाग करावा लागणार आहे. अॅडलेडवर मात्र या लक्ष्याचा पाठलाग करणे तितकं सोपं नाही. 20 वर्षांपूर्वी श्रीलंकेने येथे 303 धावांचे लक्ष्य पार केले होते. त्यामुळे आज भारतीय संघ धावांचा पाठलाग करण्यात यशस्वी झाल्यास ही दुसरी सर्वोत्तम कामगिरी ठरू शकेल.
अॅरोन फिंच व अॅलेक्स करी हे दोन्ही सलामीवर झटपट बाद झाल्यानंतर मार्शने ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. त्याने उस्मान ख्वाजा, पीटर हँड्सकोम्ब, मार्कस स्टोयनिस यांच्यासह प्रत्येकी अर्धशतकी भागीदारी करून ऑस्ट्रेलियाला समाधानकारक पल्ला गाठून दिला. ग्लेन मॅक्सवेलने अखेरच्या दहा षटकांत जोरदार फटकेबाजी करताना 48 धावा चोपल्या. त्यामुळे एकवेळ 250 पर्यंतच मजल मारू शकणाऱ्या ऑस्ट्रेलियाने 9 बाद 298 धावा केल्या. अॅडलेडवर भारतीय संघाने 14 सामन्यांत 8 विजय मिळवले आहेत आणि पाच पराभवांचा सामना करावा लागला आहे. मात्र, हीच आकडेवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धची पाहिल्यास भारताला पाच सामन्यांत केवळ एकच विजय मिळवता आला आहे. त्यामुळे भारताची अॅडलेडवरील कामगिरी निराशाजनक राहिलेली आहे.