भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या दुसऱ्या वन डे सामन्यातील नाणेफेकीचा कौल पाहुण्यांच्या बाजूनं लागला. या सामन्यात शिखर धवन 96 धावांवर माघारी परतला, तर विराट कोहलीनं अर्धशतकी खेळी करताना विक्रमाला गवसणी घातली. लोकेश राहुलनेही अर्धशतकी खेळी करताना संघाला समाधानकारक पल्ला गाठून दिला.
अॅरोन फिंचनं नाणेफेक जिंकून पुन्हा एकदा टीम इंडियाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. मागच्या सामन्यातील चुका सुधारताना रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी टीम इंडियाला दमदार सुरुवात करून दिली. पण, रोहित 44 चेंडूंत 42 धावा करून माघारी परतला. त्यात सहा चौकारांचा समावेश होता. अॅडम झम्पानं त्याला 14व्या षटकात पायचीत केले. रोहितनं या निर्णयाविरोधात तिसऱ्या पंचाकडे दाद मागितली. पण, DRS मध्येही तो बाद असल्याचे स्पष्ट झाले आणि भारताला पहिला धक्का दिला.
भारतीय संघाला 81 धावांवर पहिला धक्का बसल्यानंतर शिखरने कर्णधार विराट कोहलीसह दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. शिखरनं या मालिकेतील सलग दुसरी अर्धशतकी खेळी करताना भारताच्या धावसंख्येत भर घातली. शिखर तुफान फटकेबाजी करत होता. पण, 96 धावांवर त्यानं विकेट फेकली. त्याच्या बाद होण्यावर कोहलीनंही नाराजी प्रकट केली. धवन आणि विराट यांनी दुसऱ्या विकेटसाठी 103 धावांची भागीदारी केली. शिखर 90 चेंडूंत 13 चौकार व 1 षटकार खेचून 96 धावांवर माघारी परतला. श्रेयस अय्यर 7 धावांवर झम्पाच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला.
विराटनं 56 चेंडूंत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. विराटनं चौथ्या विकेटसाठी लोकेश राहुलसह अर्धशतकी भागीदारी केली. या सामन्यात विराटनं 76 चेंडूंत 6 चौकारांसह 78 धावा केल्या. अॅश्टन अॅगर आणि मिचेल स्टार्क यांनी अप्रतिम सांघिक कामगिरी करताना विराटचा सुरेख झेल टीपला. मनिष पांडे काहीच कमाल न करता माघारी परतला. त्यानंतर लोकेश राहुलनं टीम इंडियाचा डाव सावरला. अखेरच्या षटकात लोकेश धावबाद झाला. त्यानं 52 चेंडूंत 80 धावा केल्या. त्यात सहा चौकार व 3 षटकारांचा समावेश होता. टीम इंडियानं 6 बाद 340 धावांपर्यंत मजल मारली.
India vs Australia, 2nd ODI : रोहित शर्माचा आणखी एक पराक्रम, आफ्रिकेच्या दिग्गजाचा मोडला विश्वविक्रम
India vs Australia, 2nd ODI : तेंडुलकरनंतर विराट कोहलीचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध भीमपराक्रम
India vs Australia, 2nd ODI : दोघांनी टिपला विराटचा सुरेख झेल, पाहा नेमकं काय घडलं Video