Join us  

India vs Australia 2nd ODI: काय पो छे... भारताने ऑस्ट्रेलियाचा पतंग कापला, मालिकेत बरोबरी

कोहली बाद झाल्यावर महेंद्रसिंग धोनीने आपल्या भात्यातील फटके बाहेर काढले आणि आपण मॅच फिनिशर कसे आहोत, हे पुन्हा एकदा दाखवून दिले.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2019 4:25 PM

Open in App

अ‍ॅडलेड, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : कर्णधार विराट कोहलीचे शतक आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने चढवलेला धावांचा साज, यामुळे भारताला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताला विजय मिळवता आला. ऑस्ट्रेलियाने भारतापुढे 299 धावांचे आव्हान ठेवले होते. भारताने हे आव्हान सहा विकेट्स राखून पूर्ण करत विजय मिळवला. या विजयासह भारताने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे.

 

ऑस्ट्रेलियाच्या 299 धावांचा पाठलाग करताना भारताच्या सलामीवीरांनी जलद सुरुवात केली, पण त्यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. धवन बाद झाल्यावर कोहली फलंदाजीला आला आणि त्याने सामन्याची सूत्र आपल्या हातात घेतली. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीचा सामना करताना कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमधील 39वे शतक झळकावले. कोहलीने 112 चेंडूंत पाच चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर 104 धावा केल्या. कोहलीने या सामन्यात शतक झळकावले असले तरी त्याला भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब करता आले नाही. शतक झाल्यावर मोठा फटका मारण्याच्या नादात कोहली बाद झाला. कोहली बाद झाल्यावर महेंद्रसिंग धोनीने आपल्या भात्यातील फटके बाहेर काढले आणि आपण मॅच फिनिशर कसे आहोत, हे पुन्हा एकदा दाखवून दिले. धोनीने 54 चेंडूंत दोन षटकारांसह नाबाद 55 धावांची महत्वपूर्ण खेळी साकारली.

शॉन मार्शच्या दमदार शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 298 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवात फारशी चांगली झाली नव्हती. पण शॉनने यावेळी ऑस्ट्रेलियाच्या डावाला चांगला आकार दिला. शॉनने 123 चेंडूंत 11 चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर 131 धावांची दमदार खेळी साकारली. भारताकडून भुवनेश्वर कुमारने चार आणि मोहम्मद शमीने तीन बळी मिळवले.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाविराट कोहलीमहेंद्रसिंह धोनी