राजकोट, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : ऑस्ट्रेलियाविरुद्धचा दुसरा एकदिवसीय सामना सुरु असताना भारतीय संघाला शिक्षा झाल्याचे पाहायला मिळाले. या शिक्षेमुळे आता ऑस्ट्रेलियाला कमी धावांचे टार्गेट देण्यात येणार असे समजत होते. पण मैदानावरील पंचांनी हा निर्णय फिरवला. त्यामुळे जेव्हा ऑस्ट्रेलियाचा संघ फलंदाजीला आला तेव्हा त्यांना ३४१ धावांचेच टार्गेट देण्यात आले.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या दुसऱ्या वन डे सामन्यातील नाणेफेकीचा कौल पाहुण्यांच्या बाजूनं लागला. या सामन्यात शिखर धवन 96 धावांवर माघारी परतला, तर विराट कोहलीनं अर्धशतकी खेळी करताना विक्रमाला गवसणी घातली. लोकेश राहुलनेही अर्धशतकी खेळी करताना संघाला ३४० धावांचा समाधानकारक पल्ला गाठून दिला.
या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीनेही दमदार खेळी साकारली. त्याचबरोबर लोकेश राहुलनेही अर्धशतकी खेळी केली. पण या दोघांनी दमदार कामगिरी केली असली तरी त्यांच्यामुळेच भारताला शिक्षा झाल्याचे पाहायला मिळत होते. या दोघांच्या चुकीमुळे सामना सुरु असतानाच भारतीय संघावर कारवाई करण्यात आली. पण कालांतराने पंचांनी आपला निर्णय बदलला.
क्रिकेटचे काही नियम असतात, त्यांचा भंग केली की, शिक्षा केली आहे. जर कोणता खेळपट्टीला धोका पोचवत असेल तर संघावर कारवाई केली जाते. हीच गोष्ट या सामन्यात घडली. धावा काढताना पहिल्यांदा कोहली, त्यानंतर राहुल आणि रवींद्र जडेजा हे खेळपट्टीवरून धावले. त्यामुळे भारतावर पाच धावांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. या पाच धावा ऑस्ट्रेलियाला देण्यात येणार होत्या. पण पंचानी हा निर्णय बदलला आणि भारतीय संघाला पाच धावांचा दंड करण्यात आला नाही.
अॅरोन फिंचनं नाणेफेक जिंकून पुन्हा एकदा टीम इंडियाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. मागच्या सामन्यातील चुका सुधारताना रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी टीम इंडियाला दमदार सुरुवात करून दिली. पण, रोहित 44 चेंडूंत 42 धावा करून माघारी परतला. त्यात सहा चौकारांचा समावेश होता. अॅडम झम्पानं त्याला 14व्या षटकात पायचीत केले. रोहितनं या निर्णयाविरोधात तिसऱ्या पंचाकडे दाद मागितली. पण, DRS मध्येही तो बाद असल्याचे स्पष्ट झाले आणि भारताला पहिला धक्का दिला.
विराटनं 56 चेंडूंत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. विराटनं चौथ्या विकेटसाठी लोकेश राहुलसह अर्धशतकी भागीदारी केली. या सामन्यात विराटनं 76 चेंडूंत 6 चौकारांसह 78 धावा केल्या. अॅश्टन अॅगर आणि मिचेल स्टार्क यांनी अप्रतिम सांघिक कामगिरी करताना विराटचा सुरेख झेल टीपला. मनिष पांडे काहीच कमाल न करता माघारी परतला. त्यानंतर लोकेश राहुलनं टीम इंडियाचा डाव सावरला. अखेरच्या षटकात लोकेश धावबाद झाला. त्यानं 52 चेंडूंत 80 धावा केल्या. त्यात सहा चौकार व 3 षटकारांचा समावेश होता. टीम इंडियानं 6 बाद 340 धावांपर्यंत मजल मारली.