अॅडलेड, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने पहिल्या वन डे सामन्यात अर्धशतकी खेळी केली, परंतु त्याच्या धावांचा वेग संथ होता आणि त्यामुळे क्रिकेटप्रेमी प्रचंड नाराज झाले. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा वन डे सामना मंगळवारी अॅडलेड येथे होणार आहे. त्यासाठी भारतीय खेळाडू कसून सराव करत आहेत. धोनीनेही नेटमध्ये चांगलाच सराव केला. त्याने सरावाबरोबरच फलंदाज दिनेश कार्तिकला ( DK) फिरकी गोलंदाजीवर फलंदाजी कशी करावी याचे मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे मागील काही वर्षात धोनी फिरकी गोलंदाजीचा सामना करण्यात अडखळत आहे.
पहिल्या वन डे सामन्यात धोनीने 96 चेंडूंत 51 धावा केल्या आणि त्याची ही संथ खेळी भारताच्या पराभवास कारणीभूत ठरली, अशी टीका होऊ लागली. त्याला नॅथन लियॉनच्या गोलंदाजीचा सामना करण्यात अडचण होत होती. सिडनी वन डेत भारताचे आघाडीचे तीन फलंदाज अवघ्या 4 धावांवर माघारी परतले होते. त्यानंतर धोनीने हिटमॅन रोहित शर्माला साथ देत चौथ्या विकेटसाठी 137 धावांची भागीदारी केली. धोनीला मागील चार वर्षांत फिरकी गोलंदाजांविरुद्ध प्रती षटक 4.2 च्या सरासरीनं धावा करता आल्या आहेत.