अॅडलेड, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : महेंद्रसिंग धोनी आता संपला, अशी टीका गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. पण या टीकेला धोनीने आपल्या स्टाईलनेच बॅटच्या माध्यमातून उत्तर दिले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात धोनीने आपण मॅच फिनिशर आहोत, हे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.
दुसऱ्या सामन्यात शतक झाल्यावर कोहली जास्त काळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही. कोहली बाद झाला तेव्हा सामना दोलायमान अवस्थेत होता. पण धोनीने दिनेश कार्तिकला साथीला घेत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
सामना जिंकायचा असेल तर डोकं कसं शांत ठेवायचं, याचा उत्तम वस्तुपाठ धोनीने यावेळी दाखवून दिला. अचूक फटके आणि धावण्यातील चापल्य, हे धोनीच्या खेळीत पाहायला मिळाले. कोहली बाद झाल्यावर महेंद्रसिंग धोनीने आपल्या भात्यातील फटके बाहेर काढले आणि आपण मॅच फिनिशर कसे आहोत, हे पुन्हा एकदा दाखवून दिले. धोनीने 54 चेंडूंत दोन षटकारांसह नाबाद 55 धावांची महत्वपूर्ण खेळी साकारली.
धोनीच्या या खेळीची खासियत म्हणजे, त्याने सुरुवातीला संयम दाखवला. नेहमीप्रमाणे त्याने स्थिरस्थावर होण्यासाठी थोडा वेळ घेतला. स्थिरस्थावर झाल्यावर त्याने एकेरी-दुहेरी धावा घेणे सुरु केले. कोहली बाद झाल्यावर त्याने सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. विजयासाठी कमी चेंडूंमध्ये जास्त धावा हव्या असताना फक्त मोठे फटके मारायचे नसतात, हे त्याने या खेळीतून दाखवून दिले. अखेरच्या षटकापर्यंत सामना नेला. गेल्या काही सामन्यांमध्ये धोनीला सूर गवसला नव्हता, असे म्हटले जायचे. पण या सामन्यानंतर धोनीने आपण कसे चांगले फिनिशर आहोत, हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.