भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या दुसऱ्या वन डे सामन्यातील नाणेफेकीचा कौल पाहुण्यांच्या बाजूनं लागला. अॅरोन फिंचनं नाणेफेक जिंकून पुन्हा एकदा टीम इंडियाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. मागच्या सामन्यातील चुका सुधारताना रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी टीम इंडियाला दमदार सुरुवात करून दिली. या दोघांनी अर्धशतकाहून अधिक धावांची भागीदारी करताना ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले. या सामन्यात रोहितनं नावावर एक पराक्रम केला. त्यानं दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम आमलाचा विक्रम मोडला.
रोहितनं या सामन्यात 30वी धाव घेताच वन डे क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून 7000 धावा पूर्ण केल्या. आंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 7000 धावा करणाऱ्या सलामीवीराचा मान रोहितनं पटकावला. त्यानं 137 डावांमध्ये हा पल्ला सर केला. आफ्रिकेच्या आमलाचा 147 डावांचा विक्रम त्यानं मोडला. या विक्रमात. सचिन तेंडुलकर ( 130 डाव), तिलकरत्ने दिलशान ( 165 डाव) आणि सौरव गांगुली ( 168 डाव) हे अव्वल पाचात आहे.
रोहित 44 चेंडूंत 42 धावा करून माघारी परतला. त्यात सहा चौकारांचा समावेश होता. अॅडम झम्पानं त्याला 14व्या षटकात पायचीत केले. रोहितनं या निर्णयाविरोधात तिसऱ्या पंचाकडे दाद मागितली. पण, DRS मध्येही तो बाद असल्याचे स्पष्ट झाले आणि भारताला पहिला धक्का दिला.