अॅडलेड, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : सिडनी वन डे सामन्यातील शतकवीर रोहित शर्मा मंगळवारीही धावांचा पाऊस पाडेल, अशी अपेक्षा चाहत्यांना होती. त्याने सुरुवातही झोकात केली, परंतु मार्कस स्टॉयनिसने त्याला बाद केले आणि चाहते निराश झाले. रोहितने 52 चेंडूंत 2 चौकार व 2 षटकार खेचून 43 धावा केल्या. बाद झाल्यामुळे रोहितला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या एका विक्रमाशी बरोबरी करता आली नाही. त्यासह तो आज सर व्हिव्हियन रिचर्ड्स यांचाही विक्रम मोडू शकला नाही.
अॅडलेडवर सुरू असलेल्या दुसऱ्या वन डे सामन्यात भारतीय संघ 299 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायला मैदनावर उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली. शिखर धवन आणि रोहित यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 47 धावा जोडल्या. धवन ( 32) माघारी परतताच रोहितने कर्णधार विराट कोहलीसह भारताला शतकी उंबरठा ओलांडून दिला. रोहित-विराटची अर्धशतकी भागीदारी स्टॉयनिसने संपुष्टात आणली. रोहितला 43 धावांवर माघारी फिरावे लागले.
रोहितला या सामन्यात शतक झळकावून तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी करण्याची संधी होती. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलग तीन वन डे सामन्यांत शतक झळकावणारा तेंडुलकर हा एकमेव खेळाडू आहे आणि रोहित या विक्रमाशी बरोबरी करू शकला असता. रोहितने नागपूर येथे 2017 मध्ये 125 धावांची खेळी केली होती आणि त्यानंतर सिडनीत त्याने 133 धावा केल्या. तेंडुलकरने 1998 साली (143, 134, 141) ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलग तीन शतकं झळकावली होती.
त्याव्यतिरिक्त रोहितला आणखी एका विक्रमाने हुलकावणी दिली. आजच्या सामन्यात रोहितने 62 धावा केल्या असत्या तर तो रिचर्ड्स यांना मागे टाकू शकला असता. रिचर्ड यांनी ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वात जलद वन डे 1000 धावा केल्या होत्या. रिचर्ड्स यांनी 19 डावांत हा विक्रम केला होता. या सामन्यापूर्वी रोहितच्या नावे 17 डावांत 938 धावा होत्या.