भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या वन डे मालिकेतील दुसरा सामना आज राजकोट येथे खेळवण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलियानं पहिल्या सामन्यात दणदणीत विजय मिळवून तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे मालिकेतील पराभव टाळण्यासाठी टीम इंडियाला आजचा सामना जिंकावा लागेल. त्यात रिषभ पंतने दुखापतीमुळे दुसऱ्या सामन्यातून माघार घेतल्यानं टीम इंडियाच्या अडचणीत वाढ झालेली आहे. त्यामुळे करो वा मरो सामन्यात टीम इंडियाचा आज कस लागणार आहे. संघातील बदल टीम इंडियासाठी धोक्याचा ठरेल की फायद्याचा हे निकालानंतरच स्पष्ट होईल.
पहिल्या वन डे सामन्यात शिखर धवन आणि लोकेश राहुल वगळता टीम इंडियाच्या अन्य फलंदाजांनी निराश केले. धवन आणि लोकेश यांच्या 121 धावांच्या भागीदारीनंतर टीम इंडियाला 255 धावा करता आल्या. डेव्हीड वॉर्नर आणि अॅरोन फिंच यांच्या वैयक्तिक शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं एकही विकेट न गमावता हा सामना जिंकला. त्यामुळे टीम इंडियाला मालिकेतील आव्हान वाचवण्यासाठी आजचा सामना जिंकावा लागेल.
वानखेडेवर झालेल्या पहिल्या सामन्यात रिषभला दुखापत झाली. पॅट कमिन्सनं टाकलेला उसळता चेंडू पंतच्या हेल्मेटवर आदळला. त्यामुळे सामन्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते आणि गुरुवारी बीसीसीआयनं तो दुसऱ्या सामन्यात खेळणार नसल्याचे जाहीर केले. टीम इंडियानं या मालिकेसाठी राखीव यष्टिरक्षक निवडला नसल्यानं आता लोकेश राहुलवर ही जबाबदारी आली आहे. त्यामुळे रिषभच्या जागी संघात कोणाला संधी मिळेल याची उत्सुकता आहे.
पहिल्या सामन्यात विराट चौथ्या क्रमांकावर उतरला होता, परंतु तो ही चूक पुन्हा करणार नाही. त्यामुळे रोहित शर्मा आणि शिखर सलामीला येतील. त्यानंतर विराट, लोकेश, श्रेयस अशी फलंदाजी क्रमवारी असेल. रिषभच्या जागी संघात स्थान पटकावण्यासाठी केदार जाधव, शिवम दुबे आणि मनीष पांडे असे तीन खेळाडू शर्यतीत आहेत. त्यापैकी केदार आणि मनीष यांचे पारडे जड मानले जात आहे. गोलंदाजीत शार्दूल ठाकूरच्या जागी नवदीप सैनी संघात येऊ शकतो. त्याला मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांची साथ मिळेल. अष्टपैलू म्हणून रवींद्र जडेजा, तर फिरकीची जबाबदारी कुलदीप यादवकडे असणार आहे.
असा असेल आजचा संघरोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, केदार जाधव/मनीष पांडे, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, शार्दूल ठाकूर/नवदीप सैनी, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह.