भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातला दुसरा वन डे सामना राजकोटवर खेळवण्यात येणार आहे. पहिल्या सामन्यातील चूकांमधुन धडा घेत टीम इंडिया या सामन्यात मालिकेतील आव्हान कायम राखण्याच्या निर्धाराने उतरणार आहे. ऑस्ट्रेलियानं पहिला सामना जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे करो वा मरो अशा कात्रीत सापडलेल्या टीम इंडियाला हा सामना जिंकावाच लागेल. पण, राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवरील इतिहास पाहता टीम इंडियाला विजय मिळवण्यासाठी 200 टक्के योगदान देऊन खेळावे लागेल.
पहिल्या वन डे सामन्यात शिखर धवन आणि लोकेश राहुल वगळता टीम इंडियाच्या अन्य फलंदाजांनी निराश केले. धवन आणि लोकेश यांच्या 121 धावांच्या भागीदारीनंतर टीम इंडियाला 255 धावा करता आल्या. डेव्हीड वॉर्नर आणि अॅरोन फिंच यांच्या वैयक्तिक शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं एकही विकेट न गमावता हा सामना जिंकला. त्यामुळे राजकोटवर टीम इंडियाची खरी परीक्षा असणार आहे. पण, राजकोटवर टीम इंडियाची कसोटी आहे. येथे 11 जानेवारी 2013मध्ये भारत पहिला आंतरराष्ट्रीय वन डे सामना खेळला होता.
अॅलेस्टर कूक आणि इयान बेल यांनी या सामन्यात अनुक्रमे 75 (83 चेंडू) आणि 85 ( 96) धावा करताना संघाला 50 षटकांत 4 बाद 325 धावांपर्यंत मजल मारून दिली होती. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली उतरलेल्या टीम इंडियाला 9 धावांनी पराभव पत्करावा लागला होता. भारताला 316 धावा करता आल्या होत्या. त्या सामन्यात खेळलेले विराट कोहली ( 15) आणि रवींद्र जडेजा ( 7) हे दोघेच आजच्या सामन्यात खेळणार आहेत.
त्यानंतर टीम इंडिया 18 ऑक्टोबर 2015मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध येथे खेळली. मॉर्ने मॉर्केलनं या सामन्यात मॅन ऑफ दी मॅच पुरस्कार पटकावला. 271 धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाला 6 बाद 252 धावा करता आल्या. रोहित शर्मानं 65 धावांची खेळी केली होती. याही आधी 1986मध्ये राजकोटच्या जून्या स्टेडियमवर भारत - ऑस्ट्रेलिया भिडले होते. त्यात अॅलेन बॉर्डरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या ऑसींनी 91 धावांनी विजय मिळवला होता.
India vs Australia, 2nd ODI : करो वा मरो सामन्यात टीम इंडियाचा कस लागणार, अंतिम 11मध्ये कोण असणार?