राजकोट, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळवला. पण तरीही भारताच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. कारण भारताला आता तिसरा धक्का बसू शकतो.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदवसीय सामन्यात भारताचा यष्टीरक्षक रिषभ पंत हा जायबंदी झाला होता. या दुखापतीमुळे त्याला दुसऱ्या सामन्यातही खेळता आले नव्हते. त्याच्या जागी लोकेश राहुलने आता भारताच्या यष्टीरक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे.
दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा सलामीवीर शिखर धवनने सर्वाधिक ९६ धावा केल्या होत्या. त्याचे शतक फक्त चार धावांनी हुकले होते. या सामन्यात मिचेल स्टार्कचा एक चेंडू धवनवर आदळला होता. चेंडू आदळल्यावर धवन थेट मैदानात कोसळला होता. ही दुखापत गंभीर असल्यामुळे तो क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरला नव्हता. त्यामुळे भारतासाठी हा दुसरा धक्का होता.
भारताने या सामन्यात ऑस्ट्रेलियापुढे ३४१ धावांचे आव्हान ठेवले होते. भारताने हा सामना ३६ धावांनी जिंकला. या सामन्यात रोहित क्षेत्ररक्षण करत असताना रोहितला दुखापत झाली होती. चेंडू पकडण्यासाठी रोहित धावत होता. चेंडू अडवताना रोहित पडला आणि त्यानंतर तो मैदानात येऊ शकला नाही. आता रोहितची दुखापत गंभीर स्वरुपाची आहे का, याबाबत भारताचा कर्णधार विराट कोहलीने अपडेट दिले आहेत.
सामन्यानंतर विराट रोहितबाबत म्हणाला की, " दुसऱ्या सामन्यात क्षेत्ररक्षण करत असताना रोहितला दुखापत झाली. त्यानंतर त्याच्याॉवर मैदानातच उपचार सुरु केले होते. पण रोहितची दुखापत ही गंभीर स्वरुपाची नक्कीच नाही."