बंगळुरू, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : विशाखापट्टणम येथे फलंदाजांच्या अपयशामुळे भारताला पराभव पत्करावा लागला. भारताच्या 126 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियालाही घाम गाळावा लागला. अखेरच्या चेंडूपर्यंत सामन्याची रंजकता कायम होती आणि त्यात ऑस्ट्रेलियाने तीन विकेट राखून बाजी मारली. या विजयासह ऑस्ट्रेलियाने दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा सामना आज बंगळुरू येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वीच्या या दौऱ्यात चांगली कामगिरी करून मनोबल उंचावण्याचा ऑस्ट्रेलियाचा प्रयत्न आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात विजय मिळवून इतिहास घडवण्याची संधीही त्यांना आहे. अॅरोन फिंचच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाचा संघाला 11 वर्षांत प्रथमच भारताविरुद्ध ट्वेंटी-20 मालिका जिंकण्याची संधी आहे. पहिल्या ट्वेंटी-20त लोकेश राहुलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करताना अर्धशतकी खेळी केली आहे. मात्र, मधल्या आणि तळाच्या फळीतील फलंदाजांच्या अपयशामुळे भारताला निर्धारित 20 षटकांत 7 बाद 126 धावा करता आल्या. नॅथन कोल्टर-नायलने तीन विकेट घेत भारताला धक्का दिला आणि त्याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. 127 धावांचे माफक लक्ष्य असूनही अखेरपर्यंत रोमहर्षक ठरलेल्या सामन्यात पाहुण्या ऑस्ट्रेलियाने बाजी मारली. ऑस्ट्रेलियाने पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात 3 विकेट राखून विजय मिळवताना मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. ग्लेन मॅक्सवेल ( 56) आणि डी अॅर्सी शॉर्ट ( 37) यांच्यामुळे ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला. जस्प्रीत बुमराहने 19व्या षटकात पुन्हा एकदा उपयुक्त गोलंदाजी करताना जगातील सर्वोत्तम गोलंदाज असल्याचे सिद्ध केले. पण, अखेरच्या षटकार उमेश यादवला विजय मिळवण्यात अपयश आले. ऑस्ट्रेलियाने अखेरच्या चेंडूवर विजय मिळवला.ऑस्ट्रेलियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे आणि आज विजय मिळवल्यास त्यांचा 2007-08 नंतर भारताविरुद्धचा पहिला ट्वेंटी-20 मालिका विजय ठरेल. भारताविरुद्ध खेळलेल्या 20 ट्वेंटी-20 सामन्यांत ऑस्ट्रेलियाने 7 सामने जिंकले आहेत, तर दोन सामने अनिर्णीत सुटले आहेत. भारताला आज पराभव पत्करावा लागल्यास, त्यांचा हा ट्वेंटी-20 तील सलग तिसरा पराभव ठरेल. यापूर्वी 2015 मध्ये भारतीय संघाला सलग तीन ट्वेंटी-20 सामने गमवावे लागले होते.