Changes in Team India T20, IND vs AUS : विश्वचषकातील पराभवानंतर सुरू झालेल्या टी२० मालिकेत टीम इंडियाने १-० अशी आघाडी घेतली. विश्वचषकानंतर भारतीय क्रिकेट संघ आपली पहिली द्विपक्षीय मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. मात्र, संघातील ज्येष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत सूर्यकुमार यादव टी२० मालिकेचे नेतृत्व करत आहे. सूर्यकुमारच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने पहिला सामना जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. आज दुसरा टी२० सामना रंगणार आहे. याच सामन्याबद्दल भारताचा माजी यष्टीरक्षक पार्थिव पटेल याने महत्त्वाचे मत नोंदवले.
"भारताच्या आताच्या संघाबद्दल काहीही अंदाज बांधणे कठी आहे. कारण भारतीय चमूमध्ये सध्याच्या घडीला अनेक प्रतिभावान खेळाडूंचा भरणा आहे. त्यामुळे संघ निवडकर्त्यांकडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पहिल्या दोन सामन्यांच्या नंतर भारतीय खेळाडूंच्या मानसिकतेबाबत आपल्याला योग्य तो अंदाज लावता येईल. भारतीय संघ विजयाच्या इराद्याने उतरलाय की संघातील सर्व शक्यता पडताळून घेण्याच्या दृष्टीने विचार करतोय, हे एकदा तपासायला लागेल. पण आजच्या सामन्याबद्दल बोलायचे तर मला असे वाटत नाही की संघात काहीही बदल होतील. कारण एका सामन्यातच संघात बदल करण्याची सध्याच्या निवडकर्त्यांची मानसिकता दिसत नाही," अशा शब्दांत पार्थिव पटेलने आपले मत मांडले.
दरम्यान, या सामन्यापूर्वी हवामानाबद्दल एक महत्त्वाची अपडेट आली आहे. सामन्याच्या एक दिवस आधी शनिवारी येथे मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे संपूर्ण मैदान पाण्याने भरल्याचे दिसून आले. खेळपट्टी झाकलेली असली तरी चिंतेची बाब म्हणजे रविवारीही पावसाची शक्यता आहे. तिरुअनंतपुरममध्ये रविवारी सकाळीही पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अहवालानुसार दुपारपर्यंत पावसाची शक्यता ५५ टक्के आहे. या काळात गडगडाटी वादळांसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, परंतु संध्याकाळी हवामान स्वच्छ राहण्याचा अंदाज आहे. अशा स्थितीत चाहत्यांना संपूर्ण सामन्याचा थरार पाहायला मिळू शकतो मात्र पुढील २४ तास राज्यात हवामान खराब राहण्याचे शक्यता आहेत.