India vs Australia, 2nd T20I: प्रमुख खेळाडू दुखापतीमुळै मैदानाबाहेर असून ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात दमदार खेळ केला. मॅथ्यू वेड ( Matthew Wade) व डी'आर्सी शॉर्ट यांनी संघाला दमदार सुरूवात करून दिली. वेडच्या फटकेबाजीनंतर स्टीव्हन स्मिथनं आक्रमक खेळ केला आणि ऑस्ट्रेलियानं भारतासमोर तगडं आव्हान ठेवलं. प्रत्युत्तरात लोकेश राहुल आणि शिखर धवन यांनी दमदार सुरुवात करून दिली. धवननं फटकेबाजी करताना ३४ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर कर्णधार विराट कोहलीनं टीम इंडियाला विजयी पथावर आणले. भारतानं मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. या कामगिरीसह टीम इंडियानं पाकिस्तानचा विक्रम मोडला
फिंचच्या अनुपस्थितीत नेतृत्वाची जबाबदारी मिळालेल्या मॅथ्यू वेडनं डी'आर्सी शॉर्टसह डावाची सुरुवात केली. ८व्या षटकात वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीवर वेडचा सोपा झेल विराट कोहलीकडून सुटला. वेडलाही वाटलं होतं की हा झेल टिपला जाईल आणि त्यामुळे तो क्रिज सोडून बराच पुढे आला होता. विराटनं लगेच चेंडू थ्रो करून वेडला धावबाद केले. वेडनं ३२ चेंडूंत १० चौकार व १ षटकार खेचून ५८ धावा केल्या. त्यानंतर आलेल्या ग्लेन मॅक्सवेलनं १३ चेंडूंत २ षटकारांसह २२ धावा केल्या. शार्दूल ठाकूरनं त्याला बाद केलं. मोइजेस हेन्रीक्स याच्यासह स्मिथनं ४७ धावा जोडल्या. स्मिथ ३८ चेंडूंत ३ चौकार व २ षटकार खेचून ४६ धावांवर युजवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर बाद झाला. हेन्रीक्सही 18 चेंडूंत 26 धावा करून टी नटराजनच्या गोलंदाजीवर बाद झाला. नटराजननं 19 धावांत 2 विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियानं 5 बाद 194 धावा केल्या.
प्रत्युत्तरात लोकेश राहुल आणि शिखर धवन यांनी टीम इंडियाला सॉलिड सुरुवात करून दिली. राहुल व धवन यांनी पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली, परंतु सहाव्या षटकात अँड्य्रू टायनं भारताला धक्का दिला. राहुल २२ चेंडूंत २ चौकार व १ षटकार मारून ३० धावांवर झेलबाद झाला. त्यानंतर धवननं फटकेबाजी करताना ३४ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. पण, अॅडम झम्पानं ३६ चेंडूंत ४ चौकार व २ षटकार मारून ५२ धावा करणाऱ्या धवनला माघारी पाठवून टीम इंडियाला मोठा धक्का दिला. संजू सॅमसन ( १५) पुन्हा अपयशी ठरला. विजयासाठी ४६ धावांची गरज असताना डॅनिएल सॅम्सनं ऑसींना मोठी विकेट मिळवून दिली. विराट २४ चेंडूंत २ चौकार व २ षटकारासह ४० धावांत माघारी परतला. हार्दिक व श्रेयस अय्यरनं अखेरच्या षटकात फटकेबाजी करून सामन्यासह मालिकाही खिशात घातली. हार्दिक २२ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ४२ धावांवर, तर अय्यर ५ चेंडूंत १२ धावांवर नाबाद राहिला. भारतानं ६ विकेट्स राखून हा सामना जिंकला.
मोडला पाकिस्तानचा विक्रमसलग १० ट्वेंटी-२० सामन्यांत टीम इंडिया अपराजित राहिली आहे. या कामगिरीसह टीम इंडियानं सलग ९ ट्वेंटी-२० सामने जिंकण्याचा पाकिस्तानचा विक्रम मोडला. पाकिस्तानने जुलै २०१८ ते नोव्हेंबर २०१८ या कालावधीत सलग ९ ट्वेंटी-२० सामने जिंकले होते. टीम इंडियाने गेल्या वर्षी डिसेंबरपासून एकही टी-२० लढत गमावलेली नाही. सलग सर्वाधिक ट्वेंटी-२० लढती जिंकण्याचा विक्रम अफगाणिस्तानच्या नावावर आहे. त्यांनी २०१८ ते २०१९ या कालावधीत १२ लढती जिंकल्या. यापूर्वी त्यांनी २०१६ ते २०१७ या काळात सलग ११ सामन्यात विजय मिळवला होता.