India vs Australia, 2nd T20I: टीम इंडियानं पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात विजय मिळवून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. आजच्या सामन्यात मालिका वाचवण्याचे आव्हान ऑस्ट्रेलियासमोर असणार आहे. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला डेव्हिड वॉर्नरची ( David Warner) उणीव प्रकर्षाने जाणवली. त्यात आता दुसऱ्या व तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातून प्रमुख गोलंदाज मिचेल स्टार्क ( Mitchell Starc) यानं माघार घेतल्यानं त्यांची डोकेदुखी आणखी वाढली आहे. स्टार्कनं वैयक्तिक कारणास्तव ही माघार घेतली आहे.
पहिल्या टी-२० मध्ये जडेजाच्या डोक्याला दुखापत झाल्यानंतर ‘कनकशन’ पर्याय म्हणून आलेल्या युजवेंद्र चहलने शानदार गोलंदाजी करताना तीन बळी घेतले होते. भारताला तळाच्या फळीत जडेजाच्या आक्रमक फलंदाजीची उणीव भासेल, पण विजयामुळे भारताचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. जडेजाने २३ चेंडूंमध्ये नाबाद ४४ धावा करीत भारताला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली होती. युजवेंद्र आणि पदार्पणवीर टी नटराजन यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेत भारताला ११ धावांनी विजय मिळवून दिला.
ऑस्ट्रेलिया संघाचे प्रमुख प्रशिक्षक जस्टीन लँगर यांनी सांगितले की,''जगात कुटुंबापेक्षा महत्त्वाचे काहीच नाही. त्यामुळे मिचेलला जेव्हा वाटेल, तेव्हा तो परत येऊ शकतो. त्याचे आम्ही स्वागतच करू.'' मिचेल भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीत खेळेल की नाही याबाबतही साशंकता आहे. पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात मिचेलनं ३४ धावांत २ विकेट्स घेतल्या होत्या. त्यानं शिखर धवनचा ( १) त्रिफळा उडवला होता.
ऑस्ट्रेलिया संघातील दुखापतग्रस्त खेळाडूंची संख्या वाढत चालली आहे. डेव्हिड वॉर्नर आणि अॅश्टन अॅगर हे दुखापतीमुळे संघाबाहेर आहेत. कसोटी मालिकेपूर्वी पॅट कमिन्सला मर्यादित षटकांच्या मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. मार्कस स्टॉयनिसही पूर्णपणे तंदुरूस्त नाही. त्याशिवाय कर्णधार अॅरोन फिंचही दुखापतग्रस्त आहे. तो आज खेळेल की नाही याचीही गॅरंटी नाही.
उभय संघ यातून निवडणारभारत :- विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मयांक अग्रवाल, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन, वाशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चाहर, टी. नटराजन, शार्दुल ठाकूर.
ऑस्ट्रेलिया :- ॲरोन फिंच (कर्णधार), सीन एबोट, एश्टोन एगर, एलेक्स कारे, कॅमरन ग्रीन, जोश हेजलवुड, मोइजेस हेनरिक्स, मार्नस लाबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, डॅनियल सॅम्स, केन रिचर्डसन, स्टीव्हन स्मिथ, मिशेल स्टार्क, मार्कस स्टोइनिस, मॅथ्यू वेड, डार्सी शॉर्ट, एडम झम्पा.
सामना दुपारी १.४० पासूनभारतीय वेळेनुसार