बंगळुरू, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : महेंद्रसिंग धोनीची फलंदाजी ही भारतीय संघासाठी चिंतेची बाब बनली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात धोनीनं 29 धावा केल्या. भारताच्या पराभवानंतर धोनीवर टीका करण्यात आली. धोनीला ट्वेंटी-20 संघातून बाहेर बसवा अशी मागणी होत आहे. त्याला चेन्नई सुपर किंग्सचा माजी सहकारी हेमंग बदानीनेही सहमती दर्शवली आहे. आज होणाऱ्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात धोनीला बसवून विजय शंकरला संधी द्यावी अशी मागणी बदानीने केली आहे. तसेच त्याने रिषभ पंत व दिनेश कार्तिक या दोघांनाही अंतिम अकरात कायम ठेवावे, असे मत व्यक्त केले आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज शॉन टेट यानेही बदानीच्या मताशी सहमती दर्शवली आहे.
भारताचा माजी क्रिकेटपटू बदानीने 2000 ते 2008 या कालावधीत चार कसोटी व 40 वन डे सामने खेळले आहेत. याच अनुभवाच्या जोरावर बदानी म्हणाला,'' आगामी वर्ल्ड कप स्पर्धेत यष्टिमागे धोनी हाच पहिली पसंती असेल. पण, राखीव यष्टिरक्षक म्हणून रिषभ पंत व दिनेश कार्तिक यांच्यापैकी एकाची निवड करण्यापूर्वी त्यांना अधिकाधिक संधी देणे गरजेचे आहे. त्यामुळेच आज होणाऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात पंत व कार्तिक यांना खेळवावे आणि धोनीला विश्रांती देऊन विजय शंकरला संधी द्यावी.''
बदानीच्या मतावर टेटला विचारले असता तो म्हणाला,''धोनीला संधी द्यायला हवी. पण, वर्ल्ड कप स्पर्धा डोळ्यासमोर ठेवताना दुसऱ्या यष्टिरक्षकाला अधिकाधिक संधी मिळायला हवी.''
शिखर धवन की विजय शंकर; आजच्या सामन्यात कशी असेल रणनीती? विशाखापट्टणम येथे झालेल्या रोमहर्षक सामन्यात पाहुण्या ऑस्ट्रेलियाने बाजी मारली आणि दोन सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली. उभय संघांत आज बंगळुरू येथे दुसरा सामना होणार आहे. या सामन्यात भारतीय संघाला नाचक्की टाळण्यासाठी, तर ऑस्ट्रेलियाला इतिहास रचण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.
पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यातून कर्णधार विराट कोहली, लोकेश राहुल आणि उमेश यादव यांनी संघांत पुनरागमन केले. लोकेशच्या समावेशामुळे नियमित सलामीवीर शिखर धवनला बसवण्यात आले होते. राहुलनेही खणखणीत अर्धशतक झळकावत झोकात पुनरागमन केले. पण उमेशला अपयश आले आणि कोहलीला (२४) मोठी खेळी करता आली नाही. हार्दिक पांड्याने दुखापतीमुळे मालिकेतून माघार घेतली आणि पहिल्या सामन्यात त्याची उणीव जाणवली. भारताकडे जलद मारा करणारा तिसरा पर्यायच नव्हता. अशा परिस्थितीत अष्टपैलू विजय शंकरचा आजच्या सामन्यात समावेश होऊ शकतो.
दिनेश कार्तिक व रिषभ पंत यांना साजेशी कामगिरी करता आली नाही. त्यामुळे त्यांच्यापैकी एकाला आज बाकावर बसावे लागू शकते. या सामन्यात धवन पुनरागमन करू शकतो. रोहित शर्माला विश्रांती दिली जाऊ शकते. गोलंदाजीत उमेशच्या जागी सिध्दार्थ कौल संघात खेळू शकतो. त्यामुळे आजच्या सामन्यात भारतीय संघ पाच फलंदाज, दोन जलदगती, तीन फिरकीपटू व एक अष्टपैलू अशा सह मैदानात उतरण्याची शक्यता आहे. बंगळुरूची खेळपट्टी फलंदाजांना मदत करणारी आहे.