Join us  

भारत-ऑस्ट्रेलिया दुसऱ्या टी२० मध्ये पाऊस ठरू शकतो 'व्हिलन'; जाणून घ्या महत्त्वाची अपडेट

भारत टी२० मालिकेत एका विजयासह आघाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2023 8:45 AM

Open in App

IND vs AUS 2nd T20 Latest Updates : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी२० मालिकेतील दुसरा सामना आज होणार आहे. तिरुअनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड स्टेडियमवर या सामन्यासाठी दोन्ही संघ भिडतील, परंतु या सामन्यापूर्वी हवामानाबद्दल एक महत्त्वाची अपडेट आली आहे. सामन्याच्या एक दिवस आधी शनिवारी येथे मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे संपूर्ण मैदान पाण्याने भरल्याचे दिसून आले. खेळपट्टी झाकलेली असली तरी चिंतेची बाब म्हणजे रविवारीही पावसाची शक्यता आहे.

तिरुअनंतपुरममध्ये रविवारी सकाळीही पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अहवालानुसार दुपारपर्यंत पावसाची शक्यता ५५ टक्के आहे. या काळात गडगडाटी वादळांसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, परंतु संध्याकाळी हवामान स्वच्छ राहण्याचा अंदाज आहे. अशा स्थितीत चाहत्यांना संपूर्ण सामन्याचा थरार पाहायला मिळू शकतो मात्र पुढील २४ तास राज्यात हवामान खराब राहण्याचे संकेत आहेत.

टीम इंडियाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. विश्वचषकानंतर भारतीय क्रिकेट संघ आपली पहिली द्विपक्षीय मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. मात्र, संघातील अव्वल खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत सूर्यकुमार यादव टी२० मालिकेचे नेतृत्व करत आहे. सूर्यकुमारच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने पहिला सामना जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा २ गडी राखून पराभव केला होता. कर्णधार सूर्यकुमार यादवने स्वत: चमकदार कामगिरी करत ८० धावांची दमदार खेळी केली. मात्र, या सामन्यात संघाची गोलंदाजी चिंतेचा विषय ठरली आणि ती चांगलीच महागात पडली. मुकेशशिवाय अन्य कोणताही गोलंदाज प्रभावी ठरला नाही.अशा परिस्थितीत सूर्यकुमार यादव दुसऱ्या टी-२० सामन्यात त्या चुकांची पुनरावृत्ती न करण्याचा प्रयत्न करेल आणि सलग दुसरा विजय नोंदवून मालिकेत आपली आघाडी अधिक मजबूत करेल, अशी भारतीय क्रिकेटरसिकांना आशा आहे.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाटी-20 क्रिकेटसूर्यकुमार अशोक यादवभारतपाऊस