India vs Australia, 2nd T20I: टीम इंडियानं पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात विजय मिळवून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. आजच्या सामन्यात मालिका वाचवण्याचे आव्हान ऑस्ट्रेलियासमोर आहे. त्यात दुखापतीनं त्यांना त्रस्त केले आहे. असे असूनही मॅथ्यू वेड व डी'आर्सी शॉर्ट यांनी संघाला दमदार सुरूवात करून दिली. पण, नाट्यमय रितीनं वेड माघारी परतला.
पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला डेव्हिड वॉर्नरची ( David Warner) उणीव प्रकर्षाने जाणवली. त्यात दुसऱ्या व तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातून प्रमुख गोलंदाज मिचेल स्टार्क ( Mitchell Starc) यानं माघार कर्णधार अॅरोन फिंचही ( Aaron Finch) या सामन्यात खेळत नाही. दुसरीकडे भारतीय संघातही तीन बदल पाहायला मिळत आहे. मनीष पांडेच्या कोपऱ्यात दुखापत झाली आहे आणि त्याच्या जागी संघात श्रेयस अय्यरचे कमबॅक झाले आहे. मोहम्मद शमीच्या जागी शार्दूल ठाकूर, तर रवींद्र जडेजाच्या जागी युजवेंद्र चहलचा अंतिम ११मध्ये समावेश करण्यात आला आहे.
फिंचच्या अनुपस्थितीत नेतृत्वाची जबाबदारी मिळालेल्या मॅथ्यू वेडनं डी'आर्सी शॉर्टसह डावाची सुरुवात केली. वेडनं आक्रमक पवित्रा घेताना भारतीय गोलंदाजांचा समाचार घेतला. पहिल्या चार षटकात कर्णधार विराट कोहलीनं चार तीन गोलंदाजांना पाचारण केलं. दीपक चहरच्या पहिल्याच षटकात वेडनं १३ धावा कुटल्या. त्यात एका अतरंगी फटक्याचाही समावेश होता. वेडनं पहिल्या चार षटकांत ऑस्ट्रेलियाला ४६ धावा करून दिल्या. टी नटराजननं पाचवं षटक फेकलं आणि त्याच्या पहिल्याच षटकात ऑसींना धक्का बसला. श्रेयस अय्यरनं सीमारेषेनजीक शॉर्टचा ( ९) झेल टिपला.
वेडनं पहिल्याच षटकात दीपक चहरच्या गोलंदाजीवर मारलेला फटका चर्चेचा विषय ठरत आहे. ४३ धावांवर असताना हार्दिक पांड्यानं ऑसी कर्णधाराचा झेल सोडला. ऑस्ट्रेलियानं पहिल्या पॉवरप्लेमध्ये १ बाद ५९ धावा केल्या. वेडनं २६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. त्याचं हे ट्वेंटी-20तील दुसरे अर्धशतक ठरलं आणि या दोन्ही ५०+ धावा भारताविरुद्धच केल्या आहेत. ८व्या षटकात वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीवर वेडचा सोपा झेल विराट कोहलीकडून सुटला. वेडलाही वाटलं होतं की हा झेल टिपला जाईल आणि त्यामुळे तो क्रिज सोडून बराच पुढे आला होता. विराटनं लगेच चेंडू थ्रो करून वेडला धावबाद केले. वेडनं ३२ चेंडूंत १० चौकार व १ षटकार खेचून ५८ धावा केल्या.
पाहा नेमकं काय झालं