India vs Australia, 2nd Test : विराट कोहलीच्या ( Virat Kohli) अनुपस्थिती टीम इंडियाचे नेतृत्व सांभाळणाऱ्या अजिंक्य रहाणेनं ( Ajinky Rahane) ऑस्ट्रेलियाला नेतृत्वकौशल्यानं सर्वांना चकित केलं. आर अश्विनला लगेच गोलंदाजीला पाचारण करून त्यानं यजमानांना पहिल्या सत्रात धक्के दिले. ऑस्ट्रेलियाचे ३ फलंदाज अवघ्या ३८ धावांवर माघारी परतले होते. अडखळत्या सुरुवातीनंतर मार्नस लाबुशेन व ट्रॅव्हिस हेड यांनी अर्धशतकी भागीदारी करून ऑस्ट्रेलियाला सामन्यात पुनरागमन करून दिले. पण, टी टाईम ब्रेकपर्यंत ऑसींचा निम्मा संघ टीम इंडियानं तंबूत पाठवला होता. यावेळी अजिंक्य रहाणेच्या एका कृतीनं सर्वांची मन जिंकली.
जसप्रीत बुमराह व उमेश यादव यांनी खेळपट्टीचा फायदा उचलताना ऑसी फलंदाजांना कोंडीत पकडले. बुमराहनं पाचव्या षटकात ऑसींना पहिला धक्का दिला. जो बर्न्स त्यानं ( ०) यष्टिरक्षक रिषभच्या हाती झेलबाद करून माघारी पाठवले. बर्न्स माघारी परतला तरी मॅथ्यू वेड आक्रमक खेळ करत होता. अजिंक्यनं फिरकीपटू आर अश्विनला ( R Ashwin) आणले आणि त्याचा हा डाव यशस्वी ठरला. अश्विननं १३व्या षटकात ऑसींचा सलामीवीर मॅथ्यू वेडला ( ३०) माघारी जाण्यास भाग पाडले. त्यानंतर अश्विननं स्टीव्ह स्मिथला फोडू न देताच तंबूत पाठवले. चेतेश्वर पुजारानं त्याचा झेल टिपला. ऑस्ट्रेलियाची अवस्था ३ बाद ३८ अशी झाली होती. पण, लाबुशेन व हेड यांनी डाव सावरला.
खेळपट्टीचा बदललेला अंदाज पाहता कर्णधार अजिंक्यनं पुन्हा बुमराहच्या हाती चेंडू सोपवला आणि त्याचा हाही डाव यशस्वी ठरला. बुमरानं हेडला ( ३८) माघारी जाण्यास भाग पाडले. अजिंक्यनं स्लीपमध्ये सुरेख झेल टिपटून हेड व लाबुशेन यांची ८६ धावांची भागीदारी संपुष्टात आणली. मोहम्मद सिराजनं पदार्पणात पहिली विकेट घेतली. लाबुशेनला ४८ धावांवर त्यानं शुबमन गिलकरवी झेलबाद केले. दोन्ही पदार्पणवीरांनी टीम इंडियाला हे यश मिळवून दिलं. सिराजच्या या विकेटनं ऑस्ट्रेलियाची अवस्था ५ बाद १३६ अशी झाली. टी टाईम ब्रेकसाठी खेळाडू ड्रेसिंग रुमकडे जात असताना अजिंक्यनं पदार्पणवीर सिराजला टीम इंडियाला लीड करण्याचा मान दिला. त्याचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.