India vs Australia, 2nd Test : अॅडलेड कसोटीतील मानहानिकारक पराभवानंतर टीम इंडिया असा दमदार कमबॅक करेल, असे कुणालाही वाटले नव्हते. त्यात कर्णधार विराट कोहली मायदेशी परतला, दुखापतीमुळे मोहम्मद शमीनंही माघार घेतली होती. या खडतर परिस्थितीत अजिंक्य रहाणेनं ( Ajinkya Rahane) नेतृत्व कौशल्य दाखवले अन् ऑस्ट्रेलियाला सडेतोड उत्तर दिले. टीम इंडियानं बॉक्सिंग डे कसोटीत ८ विकेट राखून बाजी मारली आणि चार सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी मिळवली. अजिंक्यचे शतक अन् रवींद्र जडेजाच्या अष्टपैलू कामगिरीला अन्य गोलंदाजांनी खांद्याला खांदा लावून केलेल्या खेळीच्या जोरावर भारतानं हा सामना जिंकला.
अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane) व रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) यांच्या दमदार फलंदाजीनंतर भारतीय गोलंदाजांनी Boxing Day कसोटीत ऑस्ट्रेलियाला गुडघे टेकण्यास भाग पाडले. भारताच्या पहिल्या डावातील १३१ धावांची आघाडी भरून काढण्यासाठी मैदानावर उतरलेल्या ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २०० धावांवर गडगडला. मोहम्मद सिराजनं ( Mohammed Siraj) सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. जसप्रीत बुमराह, आर अश्विन व रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या, तर उमेश यादवनं एक बळी टिपला.
दुसऱ्या डावात जो बर्न्स ( ४), स्टीव्हन स्मिथ ( ८), कर्णधार टीम पेन ( १) ही मंडळी एकेरी धाव करून बाद झाले. मॅथ्यू वेड ( ४०) व मार्नस लाबुशेन ( २८) यांनी काही काळ संघर्ष केला, परंतु या दोघांना अनुक्रमे रवींद्र जडेजा व आर अश्विन यांनी तंबूत पाठवले. ६ बाद ९९ धावांवरून कमिन्स व ग्रीन या जोडीनं ऑस्ट्रेलियाला १५६ धावांपर्यंत नेले. या दोघांची ५७ धावांची भागीदारी चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात बुमराहनं संपुष्टात आणली. कमिन्स १०३ चेंडूंत २२ धावांवर माघारी परतला. दुसऱ्या बाजूनं ग्रीनचा संघर्ष सुरूच होता, परंतु सिराजनं ग्रीनला ( ४५) बाद करून ऑस्ट्रेलियाच्या उरलेल्या आशाही मावळून टाकल्या. ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात २०० धावा करता आल्यानं टीम इंडियासमोर विजयासाठी ७० धावांचे माफक लक्ष्य होते.
मयांक अग्रवाल ( ५) व चेतेश्वर पुजारा ( ३) झटपट माघारी परतल्यानंतर शुबमन गिल व अजिंक्य रहाणेनं संगाला विजय मिळवून दिला. अजिंक्यनं विजयी धाव घेतली. गिल ३५ धावांवर, तर अजिंक्य २७ धावांवर नाबाद राहिला. विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांच्यानंतर बॉक्सिंग डे कसोटी जिंकणारा रहाणे तिसरा भारतीय कर्णधार ठरला.
Web Title: India vs Australia, 2nd Test : Ajinkya Rahane joins the elite list of MS Dhoni and Virat Kohli to win a Boxing Day Test match as Indian captain
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.