स्फोटक अन् घातक फलंदाज ट्रॅविस हेडनं केलेले दमदार शतक आणि मार्नस लाबुशेन याने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्या डावात ३३७ धावा केल्या आहेत. मालिकेत १-० अशा पिछाडीवर असलेल्या ऑस्ट्रेलिया संघानं अॅडिलेडच्या मैदानातील दुसऱ्या कसोटी सामन्यात १५७ धावांची आघाडी घेतली आहे. दुसऱ्या डावात ही आघाडी भेदून यजमान संघासमोर टार्गेट सेट करण्याचं मोठं आव्हान भारतीय संघासमोर आहे.
दुसरा दिवस ट्रॅविस हेडनं गाजवला
नॅथन मॅकस्विनी आणि मार्नस लाबुशेन या जोडीनं १ बाद ८६ धावांवरून दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. या जोडीनं दुसऱ्या विकेसाठी ६७ धावांची भागीदारी करत संघाला मजबूत स्थितीत आणून ठेवले. स्टीव्ह स्मिथ २ (११) आणि मार्नस लाबुशने ६४ (१२६) तंबूत परतल्यावर भारतीय संघ कमबॅक करेल, असे चित्र निर्माण झाले होते. पण ट्रॅविस हेडनं तुफान फटकेबाजीचा नजराणा पेश करत ऑस्ट्रेलियाची स्थिती आणखी मजबूत केली. त्याने १४१ चेंडूचा सामना करताना १७ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने १४० धावा केल्या.
सिराज-बुमराहच्या खात्यात प्रत्येकी ४-४ विकेट्स
दुसऱ्या दिवसाच्या खेळात ट्रॅविस हेडच्या खेळीला ब्रेक लावणाऱ्या मोहम्मद सिराजनं भारताकडून सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. याशिवाय पहिल्या दिवसाच्या खेळात एक विकेट्स मिळवणाऱ्या बुमराहच्या खात्यात दुसऱ्या दिवशी ३ विकेट्स जमा झाल्या. या दोघांशिवाय नितीश रेड्डी आणि आर अश्विन यांना प्रत्येकी १ -१ विकेट मिळाली.