India vs Australia, 2nd Test : अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane) आणि रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) यांच्या १२१ धावांच्या भागीदारीच्या जोरावर टीम इंडियानं पहिल्या डावात आघाडी घेतली. तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात भारतानं ३२ धावांत ५ विकेट्स गमावल्या. टीम इंडियाचा पहिला डाव ३२६ धावांवर आटोपला आणि त्यांनी १३१ धावांची आघाडी घेतली. भारतीय गोलंदाजांच्या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला बॅकफुटवर जाण्यास भाग पाडले. उमेश यादव ८व्या षटकात माघारी परतूनही अजिंक्यनं अन्य गोलंदाजांचा सुरेख वापर करताना टीम इंडियाला विजयाच्या दिशेनं कूच करून दिली. जडेजानं गोलंदाजीतही मोठं योगदान दिलं.
७ बाद २७७ धावांवरून टीम इंडियानं तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू केला. १०० व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर अजिंक्यला माघारी जावं लागलं. अजिंक्य २२३ चेंडूंत १२ चौकारांसह ११२ धावांवर माघारी परतला. अजिंक्यनंतर मिचेल स्टार्कनं जडेजाला बाद केले. जडेजानं ५७ धावा केल्या. यानंतर टीम इंडियाचे शेपूट गुंडाळण्यात ऑस्ट्रेलियाला फार कष्ट घ्यावे लागले नाही. ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्क व नॅथन लियॉन यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या.
दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाची सुरुवात निराशाजनक झाली. जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर जो बर्न्स वाचला, परंतु उमेश यादवनं अप्रतिम चेंडू टाकून त्याला तंबूत पाठवले. चौथ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर बर्न्स ( ४) यष्टिरक्षक रिषभ पंतच्या हाती झेल देऊन माघारी परतला. बर्न्सनं या निर्णयाविरोधात DRS घेतला, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. ८व्या षटकात उमेश यादवच्या पोटरीला दुखापत झाली अन् त्याला मैदान सोडावे लागले.
भारतासाठी हा मोठा धक्का होता, परंतु अन्य गोलंदाजांची सुरेख कामगिरी केली. जसप्रीत बुमराहनं ऑसींना मोठा धक्का देताना स्टीव्हन स्मिथला ( ८) त्रिफळा उडवला. त्यानंतर वेड आणि ट्रॅव्हिस हेड यांची सेट होऊ पाहिलेली जोडी रवींद्र जडेजानं तोडली. जडेजानं वेडला ( ४० धावा) पायचीत केले. मोहम्मद सिराजनं ऑसीला धक्का देताना ट्रॅव्हिस हेडला ( १७) बाद केले. जडेजानं ऑसी कर्णधार टीम पेनला ( १) माघारी पाठवून टीम इंडियाला मोठं यश मिळवून दिले. मैदानावरील पंचांनी पेनला नाबाद दिले होते, पण स्लीपमध्ये उभा असलेला अजिंक्यला तो बाद असल्याचा आत्मविश्वास होता. त्यान लगेच DRS घेतला आणि भारताला यश आलं.
ऑस्ट्रेलियाच्या तळाच्या फलंदाजांनी पुन्हा एकदा भारतीय गोलंदाजांना झुंजवले. पॅट कमिन्स आणि कॅमेरून ग्रीन यांनी सातव्या विकेटसाठी नाबाद ३४ धावांची भागीदारी केली. ऑस्ट्रेलियानं तिसऱ्या दिवसअखेर ६ बाद १३३ धावा केल्या आणि २ धावांची आघाडी घेतली.