India vs Australia, 2nd Test : भारतीय गोलंदाजांनी उल्लेखनीय कामगिरी करताना ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २०० धावांवर गुंडाळला. मोहम्मद सिराजनं डोईजड झालेल्या कॅमेरून ग्रीनचा अडथळा दूर करून टीम इंडियाला मोठं यश मिळवून दिलं. पॅट कमिन्स आणि कॅमेरून ग्रीन या जोडीनं भारतीय गोलंदाजांना विकेटसाठी झुंजवले. पण, सकाळच्या सत्रात जसप्रीत बुमराहनं बाऊन्सरवर पॅट कमिन्सला ( २२) बाद केले. त्यानंतर सिराजनं ग्रीनला ( ४५) बाद करून ऑस्ट्रेलियाच्या उरलेल्या आशाही मावळून टाकल्या.
कर्णधार अजिंक्य रहाणेच्या ( ११२) शतकी आणि रवींद्र जडेजाच्या ५७ धावांच्या जोरावर टीम इंडियानं पहिल्या डावात ३२६ धावा करून १३१ धावांची आघाडी घेतली. जो बर्न्स ( ४), स्टीव्हन स्मिथ ( ८), कर्णधार टीम पेन ( १) ही मंडळी एकेरी धाव करून बाद झाले. मॅथ्यू वेड ( ४०) व मार्नस लाबुशेन ( २८) यांनी काही काळ संघर्ष केला, परंतु या दोघांना अनुक्रमे रवींद्र जडेजा व आर अश्विन यांनी तंबूत पाठवले.
६ बाद ९९ धावांवरून कमिन्स व ग्रीन या जोडीनं ऑस्ट्रेलियाला १५६ धावांपर्यंत नेले. या दोघांची ५७ धावांची भागीदारी चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात बुमराहनं संपुष्टात आणली. कमिन्स १०३ चेंडूंत २२ धावांवर मयांक अग्रवालच्या हाती झेल देऊन माघारी परतला. दुसऱ्या बाजूनं ग्रीनचा संघर्ष सुरूच होता, परंतु सिराजनं त्याला चक्रव्युहात अडकवले. अजिंक्यनं सेट केलेल्या फिल्डींगमध्ये ग्रीन फसला अन् जडेजाच्या हाती झेल दिला. ग्रीननं १४६ चेंडूंत ४५ धावा केल्या. मोहम्मद सिराजनं धक्कासत्र सुरूच ठेवले. ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात २०० धावा करता आल्यानं टीम इंडियासमोर विजयासाठी ७० धावांचे माफक लक्ष्य आहे.
सिराजनं सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. जसप्रीत बुमराह, आर अश्विन व रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. उमेश यादवनं एक बळी टिपला.