India vs Australia 2nd Test Day 2 Stumps :ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पिंक बॉल टेस्टमध्ये टीम इंडियाचा दुसरा अंक अर्थात दुसरा डावही अगदी स्वस्तात कोलमडला आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघानं पहिल्या डावात ३३७ धावा करत १५७ धावांची आघाडी घेतली आहे. ही आघाडी भेदून टार्गेट सेट करण्याचं मोठं आव्हान घेऊन टीम इंडियानं आपल्या दुसऱ्या डावाला सुरुवात केली. दुसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियाचा अर्धा संघ तंबूत परतला आहे.
पहिल्या डावात जे घडलं तेच दुसऱ्या डावातही पाहायला मिळालं
पहिल्या डावाप्रमाणेच दुसऱ्या डावातही आघाडीच्या फलंदाजांनी निराश केले. पॅट कमिन्स, स्कॉट बोलँड आणि स्टार्कच्या भेदक माऱ्यानं दुसऱ्या दिवसाच्या अखेऱच्या षटकात टीम इंडियाचा अर्धा संघ तंबूत परतला. लोकेश राहुल, यशस्वी जैस्वाल या सलामीवीरांसह शुबमन गिल, विराट कोहली आणि रोहित शर्मा हे आघाडीचे फलंदाज अगदी स्वस्तात माघारी फिरले आहेत. त्यांनी ठराविक अंतराने ज्या प्रकारे विकेट्स गमावल्या ते पाहून पिंक बॉल टेस्टच्या दुसऱ्या डावातही आघाडीच्या फलंदाजीतील मंडळींनी "तू चल मी आलोच" असा काहीसा सीन दाखवून दिल्याचे चित्र निर्माण झाले. दुसऱ्या दिवसाखेर भारतीय संघाने ५ बाद १२८ धावा केल्या होत्या. रिषभ पंत आणि नितीशकुमार रेड्डी ही जोडी मैदानात असून भारतीय संघ अजूनही २९ धावांनी पिछाडीवर आहे.
संघाची फिफ्टी होण्याआधी सलामी जोडी तंबूत परतली
ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३३७ धावांत आटोपल्यावर लोकेश राहुल आणि यशस्वी जैस्वाल या जोडीनं भारतीय संघाच्या दुसऱ्या डावाला सुरुवात केली. ही जोडी दुसऱ्या दिवसाअखेरपर्यंत टिकून टीम इंडियाला मजबूत सुरुवात करून देईल, अशी अपेक्षा होती. पण धावफलकावर अवघ्या १२ धावालागल्या असताना लोकेश राहुल पॅट कमिन्सच्या जाळ्यात फसला. १० चेंडूचा सामना कुरुन संघाच्या धावसंख्येत अवघ्या ७ धावांची भर घालून तो माघारी फिरला. जोश हेजलवूच्या जागी प्लेइंग इलेव्हमध्ये खेळणाऱ्या स्कॉट बोलँड याने यशस्वीच्या रुपात टीम इंडियाला दुसरा धक्का दिला. या सलामीवीरीनं ३१ चेंडूत २४ धावा केल्या. पन्नाशीच्या आत अवघ्या ४२ धावांवर भारतीय सलामी जोडी तंबूत परतली होती.
विराट, शुबमन पाठोपाठ रोहित पुन्हा अपयशी
ही जोडी माघारी फिरल्यावर सर्वांच्या नजरा हा किंग विराट कोहलीवर खिळल्या होत्या. पण तोही११ धावा करून माघारी फिरला. बोलँडनंच त्याला बाद केले. स्टार्कनं उत्तम चेंडूवर शुबमन गिलचा खेळ खल्लास केला अन् टीम इंडियाच्या आघाडीला सुरुंग लावला. पॅट कमिन्स पुन्हा आला अन् त्याने कॅप्टन रोहित शर्माला ६ धावांवर बोल्ड केले. ऑस्ट्रेलियाकडे १५७ धावांची आघाडी असताना दुसऱ्या डावात भारतीय १०५ धावांत भारताचा अर्धा संघ तंबूत परतल्याचे पाहायला मिळाले. एकाही फलंदाजाला मैदानात तग धरता आले नाही. परिणामी टीम इंडियाच्या हातून सामना निसटल्याचे चित्र दिसून येत आहे.
ऑस्ट्रेलिया मालिकेत कमबॅक करण्याच्या वाटेवर, रिषभ पंत-नितीश रेड्डी चमत्कार करणार?
भारतीय संघ पिंक बॉल कसोटीतील आपला रेकॉर्ड सुधारण्यात अपयशी ठरणार हे चित्र जवळपास स्पष्ट दिसत आहे. कारण जर आघाडीच्या पाच जणांचा निभाव लागत नसेल तर उर्वरित फलंदाजीकडून मोठी अपेक्षा ठेवणं व्यर्थच आहे. रिषभ पंत आणि नितीशकुमार रेड्डी ही जोडी आघाडी भेदून भारतीय संघाच्या धावफलकावर किती धावसंख्या लावणार ऑस्ट्रेलियासमोर भारतीय संघ आव्हानात्मक धावसंख्या उभी करू शकणार का? ते तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रातच स्पष्ट होईल.