India vs Australia, 2nd Test : पहिल्या कसोटीतील पराभव, कर्णधार विराट कोहली मायदेशी परतणार, मोहम्मद शमीनं दुखापतीनं घेतलेली माघार... यामुळे टीम इंडियासमोरील अडचणी अधिकच वाढल्या आहेत. ऑस्ट्रेलियानं पहिली कसोटी जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील तीन सामने अजून शिल्लक आहेत आणि टीम इंडिया कमबॅक करू शकेल, असा अनेकांना विश्वास आहे. दुसरा कसोटी सामना २६ डिसेंबरपासून सुरू होणार असून तत्पूर्वी भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी टीम इंडियाला महत्त्वाचा सल्ला दिला आहे. खेळाडूंनी मनातील नकारात्मकता काढून टाकाली आणि या मालिकेत कमबॅक करू शकतो या विश्वासानं मैदानावर उतरावंस असा सल्ला त्यांनी दिला.
विराट मायदेशी परत जाणार असल्यान अजिंक्य रहाणे उर्वरित कसोटींमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व सांभाळणार आहे. बॉक्सिंग डे कसोटीत टीम इंडिया अंतिम ११मध्ये पाच बदल करण्याच्या तयारीत आहेत. विराटच्या जागी लोकेश राहुल शर्यतीत आहे. त्याव्यतिरिक्त पृथ्वी शॉ, वृद्धीमान सहा व हनुमा विहारी यांच्याजागी अनुक्रमे शुबमन गिल, रिषभ पंत व रवींद्र जडेजा यांच्या नावाची चर्चा आहे. शमीनं दुखापतीमुळे दौऱ्यातून माघार घेतली आहे आणि त्याच्या जागीत मोहम्मद सिराज किंवा नवदीप सैनी यांची नावे चर्चेत आहेत.
''मेलबर्न कसोटीत जेव्हा टीम इंडिया मैदानावर उतरतील, तेव्हा त्यांनी सकारात्मक विचारानेत खेळावे. त्यांनी ऑस्ट्रेलियातील फलंदाजीतील कमकुवत बाबींवर लक्ष ठेवावे. कसोटी मालिकेत अजूनही कमबॅक करू शकतो, हा विश्वास खेळाडूंनी मनात कायम ठेवायला हवा. भारतीय खेळाडूंनी ही सकारात्मकता मनात आणली नाही, तर त्यांचा ४-० असा पराभव होईल. तेच जर सकारात्मकता ठेवली, तर पुनरागमन शक्य आहे. क्रिकेटमध्ये काही घडू शकते,''असे गावस्कर म्हणाले.
ते पुढे म्हणाले,''टीम इंडियाने दोन बदल करावे. सर्व प्रथम त्यांनी पृथ्वी शॉ याच्या जागी लोकेश राहुलला सलामीला खेळवावे. शुबमन गिल ५ किंवा ६व्या क्रमांकावर खेळवावे. त्याची कामगिरी उल्लेखनीय झालेली आहे. चांगली सुरुवात केल्यास सर्व काही बदलू शकते. शिवाय क्षेत्ररक्षणातही सुधारणा करण्याची गरज आहे.''